Delhi Coronavirus Cases : राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलेय. मागील 24 तासांत राजधानी दिल्लीमध्ये दोन हजार पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पॉझिटिव्हिटी रेटमध्येही वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दिल्ली सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात दोन हजार 73 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यादरम्यान पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच एक हजार 437 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
दिल्लीमधील सक्रीय रुग्णांची संख्याही पाच हजार 637 इतकी झाली आहे. तसेच पॉझिटिव्हिटी दर 11.46 टक्के इतका झालाय. दिल्ली सरकारकडून दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसात 17815 चाचण्या करण्यात आल्या. दिल्लीमध्ये सध्या होम आयशोलेशनमध्ये 3214 कोरोना रुग्ण आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची संख्या 350 आहे.
देशात 17 हजार 135 नवीन रुग्णांची नोंद
देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला आहे. मागील सलग चार दिवस कोरोना रुग्णांची संख्या घटली होती. यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. मागील चार दिवस कोरोना रुग्णांचा आलेख घटल्याचं पाहायला मिळाला. गेल्या 24 तासांत 17 हजार 135 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच बुधवारी दिवसभरात 19 हजार 823 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 34 लाख 3 हजार 610 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या भारतात 1 लाख 37 हजार 57 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.31 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.49 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 19 हजार 823 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचा आणखी एक रुग्ण
राजधानी दिल्लीमध्ये आज 31 वर्षीय महिलेला मंकीपॉक्स विषाणूची लागण झाल्याचं समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला नायझेरिया येथील आहे. दिल्लीमधील हा मंकीपॉक्सचा चौथा रुग्ण आहे. तसेच देशात मंकिपॉक्सच्या एकूण रुग्णांची संख्या नऊवर पोहचली आहे. मंकीपॉक्सबाधित महिलेला लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या महिलेला ताप आणि हातावर पुरळं आहेत.