Delhi Rain : लांबलेला मान्सूनचा पाऊस अखेर दिल्लीत दाखल झाला आहे. दिल्लीत सकाळपासूनच चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक भागात जोरदार पाऊस झाल्यानं दिल्लीकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील बुरारी, शाहदरा, पटपरगंज, आयटीओ क्रॉसिंग आणि इंडिया गेट या भागात चांगला पाऊस झाला. 29 जूनपासून राजधानी दिल्लीत हवामानात बदल होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली होती. त्यानुसार आज (30 जून) सकाळपासूनच दिल्लीच्या बहुतांश भागात पावसानं हजेरी लावली आहे. 


आज सकाळपासून सुरु झालेल्या दिल्लीतील पावसानं उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या दिल्लीतील द्वारकेपासून गाझियाबादपर्यंत पाऊस पडत आहे. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून कधीही पाऊस पडू शकतो. संततधार पावसामुळं शहरातील काही भागातील रस्त्यावर पाणी साचले आहे. या पावसामुळं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दिल्लीमध्ये ट्रॅफिक जाम झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आजही हवामान विभागानं शहरातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. तर शुक्रवारी हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 


पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात मान्सून पुढे सरसावला 


हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून आज संपूर्ण उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर, राजस्थानचा काही भाग, संपूर्ण दिल्ली, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात पुढे सरकला आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार,  मान्सूनच्या पहिल्या 10 दिवसांत मुसळधार पाऊस पडू शकतो. 30 जून ते 1 जुलै दरम्यान मान्सून दिल्ली एनसीआरमध्ये दाखल होईल, असा अंदाज विभागानं बुधवारी वर्तवला होता. त्यानुसार आज दिल्लीत काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. तसेच तसेच आजही काही भागात जोरदार वाऱ्यासह आणि विजांच्या गडगडाट पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 


दरम्यान, महाराष्ट्रातील काही भागातही चांगला पाऊस झाला आहे. मात्र, राज्यात काही भागात पावसानं दडी मारली आहे. तर काही भागात चांगला पाऊस झाला आहे. मुंबईसह उपनगर आणि ठाणे परिसरात रात्ररभर पावसानं हजेरी लावली. त्यामुळं मुंबईकरांना उष्णेतापासून दिलासा मिळाला आहे. तसेच गडचिरोलीतही 15 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर चांगला पाऊस झाला. त्याचबरोबर चंद्रपूरमध्ये देखील समाधानकारख पाऊस झाला. या ठिकाणी पडलेल्या पावसामुळं शेतकरी आनंदी आहेत. तर दुसरीकडे अद्यापही पावसानं दडी मारली आहे. तेथील शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट बघत आहेत.