नवी दिल्ली : हवेची गुणवत्ता खालवल्याने राजधानी दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे दिल्ली आणि परिसरात आरोग्य आणीबाणी म्हणजे हेल्थ इमर्जन्सी लागू करण्यात आली आहे. शालेय मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी दिल्लीतील सर्व शाळा 5 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणानं (ईपीसीए) प्रदूषण नियंत्रणासाठी पाच नोव्हेंबरपर्यंत दिल्ली-एनसीआरमधील बांधकामांवर पूर्णपणे बंदी घातली आहे.

दरवर्षी दिल्लीमध्ये या कालावधीत प्रदूषणाचं प्रमाण उच्च असतं. याला दिवाऴीदरम्यान वाजवले जाणारे फटाके हे मोठं कारण आहे. पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणानं दिलेल्या माहितीनुसार, सध्या दिल्लीतील हवा अत्यंत खराब आहे. याचा सर्वात जास्त त्रास शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना होतो. त्यामुळे सध्या खबरदारी म्हणून दिल्लीच्या शाळा 5 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवल्या जातील. तर नव्या बांधकामांमुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी त्यावरही बंदी असेल. तसेच दिल्ली सरकारने शालेय विद्यार्थ्यांना त्रास होउ नये म्हणून मास्कचे वाटप देखील केले आहे. ईपीसीएने दिल्लीसह, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या सचिवांनाही पत्र पाठवून आवश्यक पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहे.

हवामान गुणांक 0 ते 50 असेल तर हवेची गुणवत्ता चांगली समजली जाते. सध्या दिल्लीतील सर्वच भागात ही पातळी तब्बल 400 ते 500 च्या घरात आहे. 400 ते 500 हा हवामान गुणांक सर्वात निकृष्ट दर्जाचा समजला जातो. थोडक्यात दिल्लीकर या हवेतून दररोज सिगारेटचं एक पाकीट शरीरात घेत आहे, अशी अवस्था झाली आहे.

Delhi Pollution | वाढत्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये 'हेल्थ इमर्जन्सी' जाहीर | ABP Majha



एनसीआरमध्ये 'हेल्थ इमर्जन्सी' जाहीर करण्यात आली आहे. हेल्थ इमर्जन्सीमुळे सरकारने शाळांना 5 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. तसेच कन्स्ट्रक्शनची कामेही 5 नोव्हेंबर पर्यंत थांबवण्याचे आदेश दिले आहे. तसेच पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणानं (ईपीसीए) प्रदूषण नियंत्रणासाठी पाच नोव्हेंबरपर्यंत दिल्ली-एनसीआरमधील बांधकामांवर पूर्णपणे बंदी घातली आहे.

वाहनांमुळे होणारं प्रदूषण हे दिल्लीतली हवा खराब होण्याचं एक कारण तरच आहे. त्यामुळेच यंदाही ऑड अॅन्ड इव्हनचा प्रयोग केला जात आहे. पण प्रदूषण नियंत्रणासाठी प्रमुख उद्योग शहराच्या बाहेर नेणं, पंजाब-हरियाणातून येणाऱ्या पाचटीच्या धूरावर उपाय शोधणं या प्रमुख उपायांकडे मात्र कुणाचं लक्ष जात नाही आणि त्यामुळेच दरवर्षी दिल्लीकर प्रदूषणाच्या विळख्यात सापडत आहे.