Delhi School Bomb Hoax : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील (Delhi) शाळेत बॉम्ब असल्याची (Delhi School Bomb Hoax) धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने शाळेला ई-मेल करुन बॉम्ब असल्याची माहिती दिली आहे. दक्षिण दिल्लीतील पुष्पा विहार येथील अमृता शाळेच्या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून शाळा सील केली आहे आणि प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. बॉम्बच्या धमकीमुळे राजधानीतील शाळांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. 






ही सगळी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता बॉम्बची बातमी खोटी असल्याचे समोर आले. बॉम्बची माहिती मिळाल्यानंतर बीडीटी (बॉम्ब डिस्पोजल टीम) ने शाळेची कसून तपासणी केली आहे आणि आम्हाला अद्याप येथे काहीही सापडलेलं नसल्याची माहिती दक्षिण दिल्लीचे पोलिस आयुक्त चंदन चौधरी यांनी दिली आहे. 


आणखी अनेक शाळांना धमकीचे ई-मेलही आले आहेत...


बॉम्बची धमकी देणारा ई-मेल आल्यानंतर दिल्लीच्या सादिक नगरमधील भारतीय शाळा रिकामी करण्यात आली, त्यानंतर दिल्ली पोलिसांनी बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाला माहिती दिली. या गोंधळादरम्यान शाळा प्रशासनाने पालकांना विद्यार्थ्यांना नेण्यास सांगितले. शाळेला एक ई-मेल आला त्यानंतर शाळेच्या प्रशासनातील ब्रजेश नावाच्या व्यक्तीने पोलिसांना फोन करुन माहिती दिल्याचं समजत आहे


हे धमकीचे ई-मेल कोण पाठवत आहे?


राजधानी दिल्लीतील शाळांवर आता अनेकांच्या वाईट नजरा असल्याचं मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांवरुन समोर आलं आहे. यापूर्वीदेखील काही शाळांना अशाप्रकारचे बॉम्ब असल्याचे किंवा धमकीचे फोन आले आहेत. मुलांच्या शाळेत बॉम्ब सापडल्याचा दावा करणारी ही तिसरी घटना असून या तीनही ई-मेलमध्ये वेगवेगळ्या शाळांना लक्ष्य करण्यात आले आहे, असं असतानाही त्यांना असे ई-मेल कोण पाठवत आहे, याची अद्याप कोणतीही माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही. 


दिल्लीतील शाळा असुरक्षित?


दिल्लीतील ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही अशा घटना समोर आल्या आहे. सतत समोर येणाऱ्या या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. दिल्लीसारख्या शहरात बाकी अनेक ठिकाणांना सोडून शाळांवरच का वाईट नजरा आहेत, असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. त्यामुळे  शाळांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. सोबतच तीन घटना घडूनही पोलीस अद्याप एकाही मेल कराणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास असमर्थ ठरल्याचं बोललं जात आहे.