Amazon Layoffs : सध्या भारतात नोकऱ्यांची (Jobs) मोठी कमतरता आहे. याशिवाय दुसरीकडे इथल्या कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढत आहेत. ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी अॅमेझॉन (Amazon) भारतात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहे. कंपनी देशातील सुमारे 500 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. कंपनी सध्या छाटणीच्या प्रक्रियेत गुंतलेली आहे. या छाटणीचा फटका अॅमेझॉन वेब सर्विसेस (AWS) आणि ह्युमन रिसोर्सेस (HR) टीमला बसला आहे.


मार्चअखेरीस नऊ हजार कर्मचारी कपातीची घोषणा


अॅमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी मार्चच्या अखेरीस कर्मचारी कपातीची घोषणा केली होती. याचा परिणाम कंपनीच्या जगभरातील 9000 कर्मचाऱ्यांवर झाला आहे. क्लाऊड सर्विसेस, अॅडव्हर्टायझिंग आणि ट्वीटेट युनिट्समधील सुमारे नऊ हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली होती. स्टाफला मेमोद्वारे याची माहिती देण्यात आली होती. 


अॅमेझॉन 18 हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार


 कोची आणि लखनौमध्ये कंपनीचे सेलर ऑनबोर्डिंग फंक्शन बंद करण्यात आलं आहे. अॅमेझॉनच्या सूत्रांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेझॉनने अलिकडच्या काही महिन्यांत दुसऱ्यांदा कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने सांगितलं होतं की सुमारे 18 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात येईल. अॅमेझॉन आपल्या जागतिक योजनेअंतर्गत भारतातून अनेक कर्मचाऱ्यांची कपात करेल असं नोव्हेंबर 2022 मध्ये म्हटलं होतं. मागील काही वर्षात कंपनीने जास्त लोकांना कामावर ठेवलं होतं आणि आता अर्थव्यवस्थेच्या अनिश्चिततेमुळे खर्च करण्यासाठी कंपनीने आणखी कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, असं अॅमेझॉनच्या सीईओंनी सांगितलं होतं. 


अॅमेझॉनने भारतातील अनेक व्यवसाय बंद केले


अॅमेझॉन कंपनीमध्ये अजूनही वाढ होत आहे. कंपनीच्या सर्वात मोठ्या विक्रेत्यांपैकी एक असलेला अपेरिओ (Appario) भारतातील नियमांचे पालन करण्यासाठी नवीन विक्रेत्याकडे इन्व्हेंटरी हस्तांतरित करत आहे. दरम्यान, मागील वर्षी अॅमेझॉनने भारतातील अन्न, वितरण, अॅडटेक आणि घाऊक वितरणासह अनेक व्यवसाय बंद केले होते.


अॅमेझॉनमध्ये कर्मचारी कपात सुरुच


जानेवारी महिन्यात कंपनीने गुरुग्राम, बंगळुरुसह अनेक कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं होतं. तोट्यात असलेल्या विभागांकडून बहुतांश कपात करण्यात आली होती. आर्थिक मंदीमुळे बहुतांश आयटी कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे. जागतिक मंदीच्या भीतीमुळे इतर अनेक कंपन्याकडून कर्मचाऱ्यांची छाटणी सुरु आहे.


कंपनीकडून एकाच वेळी कर्मचारी कपातीची घोषणा का नाही?


एकाच वेळी कर्मचारी कपातीचा घोषणा का केली नाही असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण याचं उत्तर आहे की, सर्व विभागांनी अॅनालाईज फायनल केलं नव्हतं. अॅमेझॉनने जानेवारी महिन्यात 18 हजार कर्मचारी आणि मग मार्च महिन्याच्या अखेरीस 9 हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली होती. एप्रिल महिन्यात कंपनीने आपल्या व्हिडीओ गेम विभागातून 100 कर्मचाऱ्यांना कमी केलं होतं.