नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीतील इंदिरा विहार परिसरात लागलेल्या भीषण आगीत 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतील किराडी परिसरातील इंदिरा एन्क्लेव्हमधील कपड्याचा गोदामाला ही आग लागली होती. एका घराच्या ग्राऊंड फ्लोअरला हे गोदाम होतं.
प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. जवळपास साडे तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. आगीतून दोन लहान मुलं आणि एका महिलेला वाचवण्यात जवानांना यश आलं आहे.
आगीची तीव्रता एवढी होती की संपूर्ण इमारत या आगीच्या भक्ष्यस्थानी आली. पहिल्या मजल्यापर्यंत आग पोहोचल्यानंतर तेथे असलेल्या सिलेंडरला स्फोट झाला. सिलेंडरच्या स्फोटामुळे घरांची भिंतही पडली. आग लागली त्यावेळी घरात 12 जण उपस्थित होते. यापैकी 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत एकाच कुटुंबातील असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही डॉक्टरांकडून वर्तवण्यात येत आहे.
8 डिसेंबला दिल्लीच्या फिल्मिस्तान परिसरात लागलेल्या आग 43 जणांचा मृत्यू
याच महिन्यात 8 डिसेंबरला दिल्लीतील सेंट्रल दिल्लीच्या फिल्मिस्तान परिसरातील अनाज मंडीत लागलेल्या भीषण आगीत 43 जणांना मृत्यू झाला होता. आगीतून 50 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं होतं. या घटनेत अनेकांचा दम लागून मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. परिसरातील अरुंद गल्ल्यांमुळे मदतकार्य पोहोचवण्यास विलंब झाला होता. मृतामध्ये सर्व मजुरांचा समावेश होता. दिल्ली आणि एनसीआरमधील उपहार सिनेमातील आगीच्या घटनेनंतरची सर्वात मोठी घटना होती.
संबंधित बातम्या
Delhi Fire | दिल्लीच्या फिल्मिस्तान परिसरात भीषण आग, 43 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती