मुंबई : फोर्ब्स इंडियाने सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रसिद्धी मिळवणाऱ्या 100 सेलिब्रीटींची यादी जाहीर केली आहे. फोर्ब्सच्या यादीत मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुलची जोडीला या यादीत स्थान मिळालं आहे. ही जोडी 22 व्या क्रमांकावर आहे. कमाई आणि लोकप्रियतेच्या जोरावर अजय-अतुलच्या जोडीने हे स्थान मिळवलं आहे. फोर्ब्स इंडियाच्या टॉप 100 सेलिब्रिटींची यादी दरवर्षी जाहीर केली जाते.


अजय-अतुलची यांची वार्षिक कमाई 77.91 कोटी आहे. 'सैराट' चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे ही जोडी केवळ भारतातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे. भारतीय संगीतक्षेत्रात हिंदी, मराठी, तेलगूसारख्या विविध भाषांमधील चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. अजय-अतुल हे संगीत दिग्दर्शानासोबत संगीत संयोजन, पार्श्वसंगीत आणि पार्श्वगायनदेखील करतात.

या यादीत पहिल्या स्थानावर भारतीय कर्णधार विराट कोहली आहे. कोहलीची वार्षिक कमाई 252.72 कोटी आहे. तर दुसऱ्या स्थानावर अभिनेता अक्षय कुमारने स्थान मिळवले आहे. अक्षयची यावर्षाची वार्षिक कमाई 293.25 कोटी रुपये आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर अभिनेता सलमान खान आहे. सलमानची वार्षिक कमाई 229.25 कोटी रुपये आहे.

या यादीत महानायक अमिताभ बच्चन हे चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांची वार्षिक कमाई 239.25 कोटी रुपये आहे. तर पाचव्या क्रमांकावर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आहे. धोनीची वार्षिक कमाई 135.93 कोटी आहे. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. शाहरुखची वार्षिक कमाई 124.38 कोटी रुपये आहे. तर अभिनेता रणवीर सिंह सातव्या क्रमांकावर असून त्याची वार्षिक कमाई 118.2 कोटी रुपये आहे.

विशेष म्हणजे फोर्ब्सच्या या यादीत पहिल्या टॉप 10 मध्ये अभिनेत्री आलिया भटने स्थान मिळवले आहे. आलिया आठव्या स्थानावर असून तिची वार्षिक कमाई 59.21 कोटी आहे. तर दहाव्या क्रमांकावर अभिनेत्री दीपिका पादुकोण आहे. तिची वार्षिक कमाई 48 कोटी रुपये आहे. माजी क्रिकेटर सचिन तेंडूलकर नवव्या क्रमांकावर असून त्याची वार्षिक कमाई 76.96 कोटी आहे.