Delhi NCR Weathe :  दिल्ली-एनसीआरमध्ये सोमवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे उकाडा आणि उष्णतेपासून नागरिकांना दिलासा दिला मिळाला आहे. परंतु, दुसरीकडे ट्रॅफिक जॅममुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्लीतील मधुबन चौक, आनंद विहार, धौला कुआं, बाराखंबा रोड आणि आयटीओसह एनसीआर शहरातील अनेक भागात ट्रॅफिक जाम झाले आहे. पाऊस, तुंबलेले रस्ते आणि पडलेल्या झाडांमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.


गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उष्णतेमुळे दिल्लीकर त्रस्त होते. दिल्लीत या वर्षी 50 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे दिल्लीकर हैराण झाले होते. परंतु, कडाक्याच्या उन्हानंतर सोमवारी सकाळी अचानक वातावरणात बदल झाल्यानंतर उष्णतेपासून दिलासा मिळाला. लोक बदलत्या हवामानाचा आनंद लुटताना दिसले तर कुठे पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पावसानंतर तापमानातही लक्षणीय घट झाली. कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस नोंदले गेले.  




सोमवारी सकाळपासूनच उष्णतेने हैराण झालेल्या दिल्लीतील नागरिकांसाठी वातावरण आल्हाददायक झाले आहे. दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात सकाळी वादळी वारे वाहू लागले आणि त्यानंतर पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कमाल तापमानात घसरण झाली असून नागरिकांना उष्मा आणि उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. सोमवारी पहाटे साडेपाच वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस अद्याप सुरूच आहे.


दरम्यान, दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार वादळामुळे अनेक भागात रस्त्यांवर झाडे पडली असून काही गाड्यांचे नुकसान देखील झाले आहे. वादळ आणि पावसामुळे दिल्ली विमानतळावरील हवाई उड्डाणांवरही परिणाम झाला आहे.


सोमवारी सकाळपासून दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार वाऱ्यासह हलका पाऊस सुरू आहे. त्यामुळे हवामान पूर्णपणे बदलले आहे. त्यामुळे वातावरणातील उष्मा पूर्णपणे गायब झाला असून दिल्लीसह नोएडा, ग्रेटर नोएडा, गुरुग्राम, फरीदाबादसह एनसीआरमधील सर्व शहरांचे हवामान आल्हाददायक झाले आहे. विशेषतः लोकांना दमटपणापासून मोठा दिलासा मिळाला आहे.


जोरदार वादळ आणि पावसामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या तक्रारी लोकांनी कंट्रोल रूममध्ये केल्या आहेत. दिल्लीशिवाय नोएडा, गुरुग्राम, फरीदाबाद, सोनीपतसह एनसीआरमधील बहुतांश ठिकाणी वादळामुळे रस्त्यांवर झाडे पडली. अनेक ठिकाणी रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या कचाट्यात गाड्याही सापडल्या आहेत.