Delhi NCR Air Pollution Issue : राजधानी दिल्ली (Delhi) आणि एनसीआरमधील हवेची प्रदूषण पातळी वाढली आहे. सगळीकडे धूरच धूर दिसतोय. लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. यासोबतच डोळ्यातून पाणी येण्याची समस्याही उद्भवली आहे.
वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं दिल्ली-एनसीआरमध्ये GRAP-4 लागू करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर दिल्ली-एनसीआरमध्ये काही नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये BS-IV पर्यंतच्या डिझेल कारवरही बंदी घालण्यात आली आहे. दिल्लीत ट्रकचा प्रवेशही बंद करण्यात आला आहे.
गुरुवारी राजधानीच्या अनेक भागांतील हवेची गुणवत्ता 'गंभीर' श्रेणीत पोहोचली होती. सोप्या शब्दात सांगायचं तर दिल्लीची हवा आता विषारी झाली आहे. गुरुवारी संध्याकाळी दिल्लीच्या अनेक भागांत AQI 400 च्या पुढे गेला होता. ज्यामुळे लोकांना श्वास घेणंही कठीण झालं होतं. हवामानविषयक माहिती एजन्सी सफरनुसार, शुक्रवारी दिल्लीचा AQI सुमारे 450 असेल, तर नोएडामध्ये तो 500 च्या पुढे जाऊ शकतो, याचा अर्थ परिस्थिती आणखी बिघडू शकते.
नोएडाच्या शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण
गौतम बुद्ध नगर प्रशासनानं जाहीर केलं आहे की, इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचं वर्ग 8 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन चालतील. तसेच शक्य असल्यास 9वी ते 12वी पर्यंतचे वर्गही ऑनलाईन करावेत. पुढील आदेश येईपर्यंत शाळांमध्ये सर्व बाह्य क्रियाकलापांवर बंदी घालण्यात आली आहे. सर्व बोर्डाच्या शाळांना या आदेशाचे पालन करावे लागणार आहे.
दिल्लीत ऑड-इव्हन लागू होण्याची शक्यता
घसरलेल्या एअर क्वॉलिटी इंडेक्समुळे (AQI) आता दिल्लीत ऑड-इव्हन अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. भाजप आणि काँग्रेसकडूनही दिल्लीत ऑड इव्हन लागू करण्याची मागणी केली जात आहे. एअर क्वॉलिटी कमिशनने (CAQM) आपल्या आदेशात लहान मुलं, वृद्ध आणि ज्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यांनी घराबाहेर पडू नये, असे निर्देश दिले आहेत. या लोकांनी शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि घरातच थांबावं, असं सांगण्यात आले आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाची समस्या कायम आहे. गुरुवारी दिल्लीतील हवेनं अत्यंत धोकादायक पातळी गाठली होती. याच पार्श्वभूमीवर, एअर क्वॉलिटी मॅनेजमेंट कमिशन (CAQM) नं गुरुवारी दिल्ली-NCR मधील हवा गुणवत्ता ढासळताना ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (GRAP) च्या चौथ्या टप्प्यांतर्गत विविध उपाययोजना आणि निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. आजपासून हे निर्बंध लागू होणार आहेत. जाणून घेऊया चौथ्या टप्प्यात दिल्लीत कोणते निर्बंध लागू होणार?
दिल्लीत प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या उपाययोजना?
1. दिल्ली-एनसीआरमध्ये चारचाकी डिझेलवर कारवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र यातून बीएस-6, अत्यावश्यक आणि आपत्कालीन सेवा आणि अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सूट देण्यात आली आहे.
2. दिल्लीत इलेक्ट्रिक आणि सीएनजीवर चालणाऱ्या ट्रकशिवाय इतर ट्रकच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सूट देण्यात आली आहे.
3. दिल्ली-एनसीआरमधील महामार्ग, उड्डाणपूल, ओव्हरब्रिज, पॉवर ट्रान्समिशन, पाईपलाईन यांसारख्या 'रेखीय सार्वजनिक प्रकल्पां'मध्ये बांधकाम आणि पाडण्याच्या कामावर बंदी.
4. NCR मध्ये स्वच्छ इंधनावर न चालणारे सर्व उद्योग बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत, अगदी PNG पायाभूत सुविधा आणि पुरवठा नसलेल्या भागांत, NCR साठी मंजूर केलेल्या इंधनांच्या मानक सूचीनुसार इंधनाव्यतिरिक्त इतर उद्योगांनाही बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत. दरम्यान, दूध आणि दुग्धशाळा यांसारखे उद्योग आणि जीवनरक्षक वैद्यकीय उपकरणे किंवा उपकरणे, औषधे आणि औषधे यांच्या निर्मितीमध्ये गुंतलेल्या उद्योगांना या निर्बंधांमधून सूट दिली जाईल.
5. शाळा बंद करणे, आणीबाणी नसलेले व्यावसायिक उपक्रम, वाहने यासाठी राज्य सरकारांनी सम-विषम योजनेवर निर्णय घ्यावा.
6. केंद्र, राज्य सरकारे त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेऊ शकतात.
7. राजधानी दिल्लीत नोंदणीकृत डिझेलवर चालणाऱ्या मध्यम आणि अवजड वाहनांवर बंदी. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या आणि अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना सूट देण्यात आली आहे.