Delhi Mumbai Corona News: देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना (Covid-19) च्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. दिल्ली (Delhi) आणि मुंबई (Mumbai) यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य मंत्रालयाची चिंताही वाढली आहे. त्यानंतर विभागानं लोकांना मास्क वापरण्याचं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. यासोबतच लोकांना गर्दीची ठिकाणी जाणं टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. दिल्ली आणि मुंबईच्या गेल्या दहा दिवसांच्या आकडेवारीवरून, कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत असल्याचं लक्षात येत आहे. 

गेल्या 10 दिवसांत मुंबईत जवळपास दररोज 100 हून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. 3 एप्रिल रोजी देशाच्या आर्थिक राजधानीत 75 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. यापूर्वी 2 एप्रिल रोजी 172 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. पाहा मुंबईतील गेल्या 10 दिवसांची आकडेवारी... 

तारिख कोरोनाबाधितांची संख्या 
3 एप्रिल 75
2 एप्रिल 172
1 एप्रिल 189
31 मार्च 177
30 मार्च 192
29 मार्च 139
28 मार्च 135
27 मार्च 66
26 मार्च 123
25 मार्च 105 

दिल्लीतही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

दुसरीकडे, देशाची राजधानी दिल्लीबद्दल बोलायचं झालं तर, येथील आकडेवारी आणखी भयावह आहे. दिल्लीत दररोज 400 हून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे. 3 एप्रिल रोजी राजधानी दिल्लीत 293 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. यापूर्वी 2 एप्रिल रोजी 429 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. हा गेल्या सात महिन्यांतील उच्चांक आहे. असं असतानाही दिल्लीच्या बाजारपेठांमध्ये लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. पाहा दिल्लीतील गेल्या 10 दिवसांची आकडेवारी... 

तारिख कोरोनाबाधितांची संख्या 
3 एप्रिल 293
2 एप्रिल 429
1 एप्रिल 416
31 मार्च आकडेवारी जारी केलेली नाही
30 मार्च 295
29 मार्च 300
28 मार्च 214
27 मार्च 115
26 मार्च 153
25 मार्च 139

तज्ज्ञांचं म्हणणं नेमकं काय?  

दिल्लीतील कोविड-19 रुग्णांमध्ये अचानक वाढ होत असताना, तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे घाबरून जाण्याची गरज नाही आणि लोकसंख्येच्या संरक्षणावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, विशेषत: ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. 

एपिडेमियोलॉजिस्ट आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया यासंदर्भात बोलताना म्हणाले की, संसर्ग आणि रोग यात स्पष्ट फरक आहे. याचा अर्थ लोक पॉझिटिव्ह होत आहेत. परंतु त्यांच्यात गंभीर लक्षणं नाहीत. लहरिया यांनी असंही सांगितलं की, जोपर्यंत नवे गंभीर व्हेरियंट समोर येत नाही किंवा रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या वाढत नाही तोपर्यंत घाबरण्याचं कारण नाही. मात्र, सर्वांनी काळजी घेणं आणि सावध राहणं गरजेचं आहे.