Damaged Crop Purchase: यंदाचा मार्च महिना शेतकऱ्यांसाठी (Farmers) अत्यंत निराशाजनक ठरला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात मध्य आणि उत्तर भारतात अवकाळी पावसानं (unseasonal rain) हजेरी लावली. तर काही ठिकाणी गारपीट झाली. याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. अशातच उत्तर प्रदेश सरकारनं (UP Govt) शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पाऊस आणि गारपिटीमुळं नुकसान झालेलं पीक सरकार खरेदी करणार आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अुदानही देण्यात येणार आहे.
दरम्यान, फेब्रुवारीमध्ये तापमानात अचानक वाढ झाल्याचे पाहायला मिळालं. या वाढत्या उष्णतेचा परिणाम पिकांवर झाला. मात्र त्यानंतर मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं. यामध्ये मोहरी, गहू, हरभरा, मसूर या पिकांना मोठा फटका बसला. तसेच फळबागांचेही नुकसान झाले. मात्र, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना उत्तर प्रदेश सरकारनं दिलासा दिला आहे. नुकसान झालेल्या पिकांची खरेदी सरकार करणार आहे.
गहू आणि मोहरी 50 टक्क्यांहून अधिक पीक वाया
मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळं गहू आणि मोहरी पिकाचे 50 टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशमधील 10 जिल्ह्यांमधील पीक नुकसानीच्या मूल्यांकनाच्या आधारे, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी 34,137 हेक्टर पीक नुकसानीचा अंदाज लावला आहे. आग्रा, बरेली, वाराणसी, लखमीपूर खेरी, उन्नाव, हमीरपूर, झाशी, चंदौली, बरेली आणि प्रयागराजमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात 1.02 लाख शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाचा थेट फटका बसला आहे. दरम्यान, योगी सरकारने कृषी गुंतवणूक सवलत अनुदान देण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.
महाराष्ट्रातही अवकाळी पावसाचा फटका
मार्च महिन्यात महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली उभी पिक वाया गेली आहेत. हजारो हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. अजूनही अनेक ठिकाणी पंचनामे झाले नसल्याची परिस्थिती आहे. आधी अतिवृष्टीने खरीप गेले आणि आता अवकाळी पावसाने रब्बीचे नुकसान केले आहे. गहू, हरभरा, ज्वारी, मका या पिकांना मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडं केळी, डाळींब, द्राक्ष या बागांना देखील मोठा फटका बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: