SBI Server Down: स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) सर्व्हर डाऊन झाल्याच्या तक्रारी येत असून अनेक ग्राहकांना नेट बँकिंग आणि UPI सेवेसाठी अडचणी येत असल्याचं दिसून येतंय. अनेक एसबीआय वापरकर्त्यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर बँक सर्व्हर डाऊन झाल्याचं सांगितलं आहे. एसबीआयचं सर्व्हर डाऊन झालं असून नेट बँकिंग काम करत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे.
SBI च्या सेवा प्रभावित झालेल्या सेवांमध्ये नेट बँकिंग, UPI पेमेंट आणि अधिकृत SBI अॅप (YONO) यांचा समावेश आहे. यापूर्वी 1 एप्रिल रोजी एसबीआयच्या ऑनलाइन सेवांवरही परिणाम झाला होता.
1 एप्रिललाही ऑनलाइन सेवांमध्ये अडचण
यापूर्वी 1 एप्रिल 2023 रोजी, SBI ने सर्व्हर देखभालीची सूचना दिली होती. त्यामुळे त्या दिवशी एसबीआयच्या सेवा बंद राहतील असं बँकेने सांगितलं होतं.
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेट बँकिंगसह अनेक सेवा सोमवार सकाळपासून ठप्प झाल्या आहेत. अनेक यूजर्सनी त्यांना फंड ट्रान्सफर करण्यात अडचणी येत असल्याचं सांगितलं आहे. SBI च्या इंटरनेट बँकिंग सेवांव्यतिरिक्त, UPI आणि YONO अॅपशी संबंधित सेवा देखील काम करत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.
एसबीआयचे सर्व्हर डाऊन असल्याने अनेक ग्राहकांनी अडचणी येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. अनेक ग्राहकांनी त्यांच्या क्रेडिट कार्ड पेमेंटवर प्रक्रिया होत नसल्याचं सांगितलं आहे. बँकेच्या वेबसाइटवर 'something went wrong at the bank servers. Please Retry' असा मेसेज दिसत आहे. जागतिक स्तरावर बँक सर्व्हरमधील समस्यांचा मागोवा घेणाऱ्या डाउन डिटेक्टर या वेबसाइटने एसबीआयच्या सेवांमध्ये येणाऱ्या समस्यांबद्दल ट्वीटही केले आहे.
SBI चे पेमेंट गेटवे 32 तासांपासून प्रभावित
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका वापरकर्त्याने ट्वीट केलं आहे की, एसबीआयचा संपूर्ण पेमेंट गेटवे गेल्या 32 तासांपासून काम करत नाही. दरम्यान, बँकेच्या वतीने झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीरी व्यक्त करुन पुन्हा प्रयत्न करा आणि समस्या कायम राहिल्यास आम्हाला कळवा असं बँकेच्या वतीनं सांगितलं आहे.