Delhi Girl Accident : दिल्लीतील कांजवाला प्रकरणातील पीडित अंजलीच्या घरात आता चोरट्यांनी चोली केलीय. तिच्या घरातून एलसीडी टीव्ही आणि भांड्यांसह अनेक वस्तू चोरीला गेल्याचा आरोप अंजलीच्या कुटुंबीयांनी  केलाय. अंजलीचा मृत्यू झाल्यापासून तिचे कुटुंब मामाच्या घरी आहे. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी घर फोडले आहे.  


अंजलीचे कुटुंबीय दिल्लीच्या रोहिणी जिल्ह्यातील कर्ण विहार भागात राहते. अंजलीचा मृत्यू झाल्यापासून घराला कुलूप आहे. चोरट्यांनी कुलूप तोडून एलसीडी टीव्ही आणि भांडीही चोरून नेल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.   


अंजलीची मैत्रिण निधीवर कुटुंबीयांचा आरोप    


दरम्यान, या प्रकरणी मृत अंजलीच्या कुटुंबीयांनी तिची मैत्रिण निधी हिच्यावर आरोप केलाय. "हा डाव निधीचा आहे. पकडले जाण्याच्या भीतीने तिला तिचे सामान आमच्या घरात ठेवायचे आहे. एवढेच नाही तर अंजलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर प्रश्न उपस्थित करत म्हटले आहे की, गेल्या आठ दिवसांपासून पोलिस सर्वत्र होते. मात्र काल घराजवळ का नव्हते?
 
अंजलीचा मृतदेह 1 जानेवारी रोजी कांजवाला परिसरात रस्त्यावर पडलेला आढळून आला होता. अंजलीचा अपघाती मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते.अंजलीच्या स्कूटीला कारने धडक दिली होती. त्यानंतर तिला जवळपास 12 किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं होतं. यातच अंजलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना आरोपी बनवले आहे. 6 आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून सातव्या आरोपीला न्यायालयाने जामी मंजूर केलाय.   


निधीच्या भूमिकेवर कुटुंबीयांचा संशय 


अंजलीच्या अपघात प्रकरणातील मुख्य साक्षीदार असलेल्या निधीच्या भूमिकेवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अपघाताच्या वेळी निधी अंजलीसोबत उपस्थित होती. मात्र अपघातानंतर ती कोणालाही न सांगता घरी गेली. दोन दिवसांनंतर जेव्हा एका सीसीटीव्हीमध्ये ती अंजलीच्या सोबत असल्याचे उघड झाले तेव्हा तिने पोलिसांकडे तिचा जबाबब नोंदवला. अपघाताच्या वेळी ती स्कूटीवरून बाजूला पडली तर अंजली कारखाली फेकली गेली होती. तिने दावा केलाय की अंजली खूप मद्यधुंद होती. परंतु, अंजलीच्या कुटुंबीयांनी निधीचे दावे फेटाळले आहेत. 


अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी यापूर्वी निधीला अटक


दरम्यान,  निधीबाबत एक माहिती समोर आलीय. दोन वर्षापूर्वी म्हणजे 2020 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये निधीला अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात अटक केली होती. तिच्यासोबत आणखी दोन मुलांनाही अटक करण्यात आली होती. त्यावेळी निधी महिनाभर तुरुंगात होती. नंतर जामिनावर बाहेर आली. पोलिसांच्या माहितीनुसार निधी दिल्लीहून तेलंगणातील सिकंदराबाद येथे अमली पदार्थांच्या तस्करीसाठी गेली होती. तेथून तिचे दोन साथीदार समीर आणि रवी सोबत ट्रेनने आग्रा येथे आली. ही घटना 6 डिसेंबर 2020 ची आहे. 


महत्वाच्या बातम्या


दिल्लीच्या अंजली अपघात केसमध्ये नवा ट्विस्ट, रात्री दोन वाजता धावताना दिसली मैत्रीण, जाणून घ्या नेमकं काय घडलं त्या रात्री