वर्धा: आजचा तरुणवर्ग वास्तविक आयुष्यापेक्षा आभासी दुनियेत जास्त वेळ वाया घालवण्याचे दिसून येत आहे. ऑनलाईन गेम्स असो, शॉपिंग असो वा ऑनलाईन डेटिंग अॅप्स, आता सर्वच इंटरनेटवर उपलब्ध आहे. याचे जसे फायदे आहेत त्यापेक्षा कित्येकपट जास्त तोटे आहेत. इंटरनेटची सेवा कुणालाही सहज उपलब्ध असल्यामुळे सायबर गुन्हेदेखील वाढत्या प्रमाणात दिसून येत आहेत. फेक अकाऊंट्स बनवणे, ब्लॅकमेलिंग, अकाऊंट हॅकिंग असे कित्येक गुन्हे आपल्याभोवती रोजच घडत असतात. असाच एक प्रकार घडला आहे वर्ध्यात.


फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करुन मुलीचा विनयभंग करण्याप्रकरणी दिल्लीच्या आयआयआटीमधील एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. हा आयआयआटीमध्ये केमिकल इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. मुळचा बल्लारशाह येथे राहणाऱ्या स्वप्निल मावलीकरने वर्ध्यातील एका मुलीचा फोटो वापरुन फेसबुकवर फेक अकाऊंट तयार केले. नवल म्हणजे ज्या मुलीचा फोटो वापरला त्याच मुलीला स्वप्निलने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. वेगळ्या नावाच्या प्रोफाईलवर स्वत:चा फोटो पाहून मुलीला धक्काच बसला. नेमका काय प्रकार आहे पाहण्यासाठी तिने आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली.

याबाबत तिने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पुन्हा तिला दुसर्‍या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली. यावरही तिचाच फोटो होता. अकाऊंट तयार करणार्‍याने मुलीला अश्लील संदेश पाठवत धमकीही दिली. मुलीने याबाबत पुन्हा पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी शोध घेतला असता फेक अकाऊंट तयार करणारा आयआयटी दिल्लीचा विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी दिल्लीतून विद्यार्थ्यास अटक केली. अटकेनंतर जामीनावर त्याची सुटका करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.