मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सात राज्यांमधील 51 मतदार संघांमध्ये सोमवारी ( 06 मे 2019) मतदान होणार. या 51 मतदार संघांमधील 674 उमेदवारांचे भविष्य सोमवारी ईव्हीएममध्ये कैद होईल. पाचव्या टप्प्यात एकूण उमेदवारांपैकी केवळ 12 टक्के(79 महिला उमेदवार) महिला उमेदवार आहेत. या टप्प्यात 8 कोटी 75 लाख 88 हजार मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावायचा आहे. या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने 96 हजार 88 मतदार संघ उभारले आहेत.


पाचव्या टप्प्यात मतदान होणार असलेल्या 51 मतदार संघांपैकी 39 मतदार संघ भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत तर तृणमूल काँग्रेसकडे 7 मतदार संघ आहेत. दोन मतदार संघांमध्ये काँग्रेसचे खासदार आहेत तर लोकजनशक्ती पार्टी, राष्ट्रीय लोकसमता पार्टी आणि पीपल्स डेमोक्रेटीक पार्टीकडे प्रत्येकी एक मतदार संघ आहे.

पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील 14 मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. त्यापैकी 12 मतदार संघ हे भाजपच्या ताब्यात आहेत. तर रायबरेली (विद्यमान खासदार : सोनिया गांधी)आणि अमेठी (विद्यमान खासदार : राहुल गांधी) हे मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यात आहेत. यावेळीदेखील या दोन्ही मतदार संघांमध्ये काँग्रेस विजयी होईल अशी चर्चा आहे. परंतु त्यासोबतच धौरहरा, बाराबांकी, फैजाबाद आणि सीतापूर हे मतदार संघ भाजपच्या हातून हिसकावण्यासाठी काँग्रेसने मोठी शक्ती पणाला लावली आहे.

पाचव्या टप्प्यात मध्यप्रदेशमधील टिकमगड, दमोह, खजुराहो, रेवा, सतना, होशंगाबाद आणि बेतुल या 7 मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. या सातही मतदार संघांमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. भाजपने सातपैकी पाच खासदारांना पुन्हा एकदा संधी दिली आहे, तर दोन मतदार संघांमध्ये नवे चेहरे आहेत. खजुराहो हा मतदार संघ 1989 पासून भाजपच्या ताब्यात आहे. (1999 या मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार जिंकला होता)तर टिकमगड, दमोह आणि बेतूल हे मतदार संघ भाजपचे बालेकिल्ले आहेत.

पाचव्या टप्प्यात बिहारमधील पाच मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. बिहारमध्ये भाजपची स्पर्धा स्थानिक पक्ष राष्ट्रीय जनता दलसोबत (राजद) होणार आहे. त्यासोबतच स्थानिक पक्ष विकासशील इन्सान पार्टीचेदेखील भाजप, काँग्रेस आणि राजदला आव्हान असणार आहे.

झारखंडमध्येदेखील यावेळी मोठ्या लढती पाहायला मिळणार आहे. झारखंडचे दोन माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी आणि अर्जुन मुंडा हे यावेळी लोकसभेच्या रेसमध्ये आहेत.