नवी दिल्ली : 'चौकीदार चोर है' या वक्तव्याबाबत मी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली आहे, भाजपची नाही. 'चौकीदार चोर है' ही अजूनही आमची घोषणा असल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी होणार आहे. तत्पूर्वी आज (शनिवार, 04 मे)राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.


राहुल गांधी म्हणाले की, 'चौकीदार चोर है', असं बोलताना मी सुप्रीम कोर्टाचा हवाला दिला. ही माझ्याकडून चूक झाली होती. त्यामुळे मी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली. परंतु 'चौकीदार चोर है' या घोषणेमुळे मी भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदी किंवा आरएसएसची माफी मागितलेली नाही. 'चौकीदार चोर है' हा आमचा नारा आहे आणि हा नारा आता देशभरात घुमत आहे.

वाचा : प्रचाराच्या जोशात 'चौकीदार चोर है' बोलून गेलो, सुप्रीम कोर्टात राहुल गांधींकडून खेद

दरम्यान राहुल गांधी यांनी नेहमीप्रमाणे आजच्या पत्रकार परिषदेतदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला. राहुल गांधी म्हणाले की, "सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप हरणार असल्याचा मला विश्वास आहे."


राहुल गांधी म्हणाले की, "भारतीय लष्कराच्या नावाने लोक मतं मागत आहेत. लष्कराचा कोणीही अपमान करु नये. सर्जिकल स्ट्राईक मोदींनी नव्हे आपल्या लष्कराने केला आहे."