Jammu Kashmir :  जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी भारतीय लष्कराने जैश-ए-मोहम्मद या दहशवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. बारामुल्लामधील क्रेरी परिसरातील जाजीभटमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक पोलीस कर्मचारी शहीद झाले. दहशतवाद्यांसोबत लढताना शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्या वडिलांनी आपल्या मुलाचा अभिमान असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या मुलाच्या बलिदानामुळे एक हजार नागरिकांचे प्राण वाचले, त्यामुळे त्याचा अभिमान आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


जम्मू-काश्मीर पोलिसांनी शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या वडिलांचा व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, माझ्या मुलाच्या बलिदानामुळे एक हजार नागरिकांचे प्राण वाचले. तो शहीद झाला असून तो आता कधीच परत येणार नाही. परंतु, मला त्याचा अभिमान आहे. दहशतवाद्यांसोबत दोन हात करताना त्याने आपला जीव दिला. त्यामुळे माझ्यासह संपूर्ण समाजाला त्याचा अभिमान आहे. 




जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू असून सुरक्षा दलांनी जानेवारीपासून लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित 26 दहशतवाद्यांना ठार केले आहे. घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत आज कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.


काश्मीर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी म्हटले आहे की, ठार करण्यात आलेल्या 26 दहशतवाद्यांपैकी 14 दहशतवादी जैश ए- संघटनेशी संबंधित होते तर 12 जण लष्कर ए-तैयबाशी संबंधित होते. 
 
दरम्यान, 13 मे रोजी जम्मू-काश्मीरमधील बंदीपुरा येथे झालेल्या चकमकीत लष्कर- ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. ठार करण्यात आलेले दोन्ही दशहतवादी काश्मीरी पंडीत राहुल भट्ट यांच्या हत्तेत सहभागी होते.