नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आगीच्या घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मध्यरात्री दिल्लीच्या पटपडगंजमध्ये  आग लागली आहे. पटपडगंजच्या औद्योगिक क्षेत्रात आग लागली असून या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे. अजूनही आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 35 गाड्या दाखल झाल्या आहेत.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मध्यरात्री 2.38 च्या सुमारास आग लागली. अजूनही आग लागण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही.


अलीकडच्या काळात राजधानी दिल्ली मध्ये आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाली आहे. यापूर्वी दिल्लीच्या पीरागढी परिसरातील एका कारखान्यात भीषण आग लागली. आग लागल्यानंतर मोठा स्फोट झाला. त्यामुळे कारखान्याची इमारत कोसळली. ही आग विझवताना 14 अग्निशमन दलाच्या कर्माचाऱ्यांसह 18 जण जखमी झाले होते. तर एका अग्निशमन जवान ठार झाला.

यापूर्वीही दिल्लीच्या धान्यबाजार क्षेत्रात आग लागली होती. त्यात 43 कामगार ठार झाले होते. यानंतर किराडी कारखान्यात भीषण आग लागली. त्यामध्ये नऊ लोकांचा मृत्यू झाला.