नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आज विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. सर्व 70 जागांचे कल समोर आले आहेत. कलांमध्ये आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. या मतमोजणीत पटपडगंज विधानसभा मतदारसंघाकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. कारण या मतदारसंघात उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. सलग नऊ फेऱ्यांमध्ये पिछाडीवर राहिल्यानंतर सिसोदिया अकराव्या फेरीत आघाडी घेतली आहे. सिसोदियांनी भाजपचे उमेदवार रविंदर सिंह नेगी यांच्यावर 700 मतांनी आघाडी मिळवली आहे. या आघाडीमुळे आपच्या जिवात जीव आला आहे.


मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच मनिष सिसोदिया पिछाडीवर होते. सिसोदिया नवव्या फेरीपर्यंत दुसऱ्या स्थानावर होते. मात्र अकराव्या फेरीत त्यांनी आघाडी घेतली आणि आता ते 700 पेक्षा जास्त मतांनी पुढे आहेत. या मतदारसंघात लक्ष्मण रावत हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. कलांमध्ये अद्यापही काँग्रेसचं खातं उघडलेलं नाही.


मनिष सिसोदिया हे दिल्ली सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. शिवाय दिल्ली सरकारमध्ये सर्वाधिक खात्यांचा भार सिसोदियांकडे होता. सिसोदिया हे दिल्ली सरकारमधील सर्वात शक्तिशाली मंत्री आहेत. आम आमदी पक्ष ज्या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक काम केल्याचा दावा करतो, त्यात शिक्षण विभागाचा समावेश आहे. हे खातं मनिष सिसोदिया यांच्याकडेच आहे. दुसरीकडे पटपडगंज विधानसभा मतदारसंघ हा भाजपचे खासदार गौतम गंभीर यांच्या लोकसभा क्षेत्रात येतो. त्यामुळे भाजपसाठी देखील हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा आहे.

Delhi Election Results | महाराष्ट्रातून नेत्यांची रसद पुरवूनही दिल्लीत भाजप अपयशी


Delhi Election Results | भाजपचा अहंकार दिल्लीकरांनी उतरवला : अनिल परब


याआधीच्या निवडणुकीतील चित्र
2013 च्या विधानसभा निवडणुकीत 'आप' उमेदवार मनिष सिसोदिया यांनी भाजप उमेदवार नकुल भारद्वाज यांना 11 हजार 476 मतांनी पराभूत केलं होतं. यानंतर 2015 मध्ये मनिष सिसोदिया यांनी भाजप उमेदवार विनोद कुमार बिन्नी यांचा 8 हजार 791 मतांनी पराभव केला होता.