संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. आजच अर्थमंत्री निर्मला सीतारमण दोन्ही सभागृहांमध्ये अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उत्तर देतील. त्यातच भाजपने राज्यसभेतील आपल्या खासदारांना व्हिप जारी केला आहे, ज्यात सर्व सदस्यांना सभागृहात उपस्थित राहून सरकारला पाठिंबा देण्यास सांगितलं आहे. यंदा अधिवेशन संपण्यापूर्वी सरकार संसेदत अर्थ विधेयक सादर करणार आहे.
सोशल मीडियावर अटकळ
रात्री उशिरा भाजपचा व्हिप समोर येताच नेटकरी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाले आणि विविध अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली. मागील काही दिवसात जेव्हा भाजपने आपल्या खासदारांसाठी व्हिप जारी केला होता, तेव्हा मोठा निर्णयांची घोषणा झाली होती. मग जम्मू-काश्मीरसाठीचं कलम 370 हटवण्याचा मुद्दा असो किंवा राम मंदिरच्या ट्रस्टच्या नावाची घोषणा असो, केंद्र सरकारने निर्णय जाहीर केले होते. याशिवाय नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या वेळीही असंच काहीसं घडलं होतं.
ट्विटरवर नेटकरी काय बोलत आहेत?
भाजपने व्हिप जारी केल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगायला सुरुवात झाली. त्यामध्ये पहिला मुद्दा 'यूनिफॉर्म सिविल कोड' म्हणजेच 'समान नागरी कायदा' हा आहे. सोशल मीडियावर एक कागदपत्र व्हायरल होत आहे, जे संसदेच्या कामकाजातील असल्याचं म्हटलं जात आहे. त्यात समान नागरी विधेयक 2020 चा उल्लेख करण्यात आला आहे.
याशिवाय दिल्लीच्या सीमेत बदल होण्याची शक्यताही सोशल मीडियावर वर्तवली जात आहे. यात सीमाभागातील काही क्षेत्र उत्तर प्रदेशात विलीन करणं, विधानसभा नसलेल्या केंद्रशासित लडाखप्रमाणे दिल्लीचा रचना करणं, अशीही चर्चा आहे. मात्र या केवळ अटकळ आहेत. सरकार किंवा पक्ष कोणीही याला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत कोणी दुजोरा देत नाही, तोपर्यंत या शक्यतांवर लक्ष न देणंच योग्य आहे.