नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या सर्व जागांचे कल हाती आलेले आहेत. त्यानुसार आम आदमी पार्टी पुन्हा एकदा दिल्ली जिंकण्यात यशस्वी झाल्याचं दिसून येत आहे. अरविंद केजरीवाल आपल्या विजयाची हॅट्रीक करण्यासाठी तयार आहेत. अशातच सुरुवातीच्या कलापासूनच पिछाडीवर असलेला भाजपला सोशल मीडियावर मात्र ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर भाजपचे प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी यांची नेटकऱ्यांना आठवण येत आहे. कारणही तसंच आहे. 8 फेब्रुवारी रोजी मतदानानंतर मनोज तिवारी यांनी एक ट्वीट केलं होतं. ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, 'सर्व एक्झिट पोल खोटे ठरणार आहेत. तुम्ही माझं हे ट्वीट सांभाळून ठेवा. भाजप दिल्ली विधानसभेत 48 जागांवर विजय मिळवणार आहे. आता सर्व जागांचे कल हाती आल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झालं आहे.
Delhi Election 2020 | निवडणूक निकालांपूर्वीचं अलका लांबा यांचं 'हे' ट्वीट चर्चेत
भाजप नेत्यांनी केले होते दावे
भाजपचे प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी आणि खासदार प्रवेश वर्मा यांसारख्या अनेक भाजप नेत्यांनी दिल्ली विधानसभेत भाजप निवडून येणार असल्याचे दावे केले होते. दोन्ही नेत्यांनी याबाबत ट्वीट केलं होतं. मनोज तिवारी यांनी ट्विटमध्ये लिहिलं होतं की, 'हे सर्व एक्झिट पोल खोटे आहेत. तुम्ही माझं हे ट्वीट सांभाळून ठेवा. भाजप दिल्ली विधानसभेत 48 जागांवर विजय मिळवणार आहे. कृपया ईव्हीएमला दोष देण्यासाठी आतापासूनच कारणं शोधू नका.' तसेच प्रवेश वर्मा निवडणूक प्रचारादरम्यान प्रषोभक भाषण करत असल्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर बंदी आणली होती.
सोशल मीडियावर ट्रोल झाले भाजप नेते
सध्या मनोज तिवारींच्या या ट्वीटच्या आधारावर नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत. काही लोक त्यांचे ट्वीट रिट्वीट करत आहेत, तर काही कमेंट करत आहेत.
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (11 फेब्रुवारी) जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या कलांमध्येच आम आदमी पक्षाने आघाडी घेत बहुमताचा आकडा पार केला आहे. तर भारतीय जनता पक्ष 13 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला मात्र अद्याप एकाही जागेवर खातं उघडता आलेलं नाही. अशातच दिल्ली विधानसभेच्या 70 जागांचे कल हाती आलेले आहेत. त्यानुसार, दिल्लीत आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन होणार असल्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे.
संबंधित बातम्या :
Delhi Election Results LIVE UPDATES | उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पिछाडीवर
Delhi Election Results | भाजपचा अहंकार दिल्लीकरांनी उतरवला : अनिल परब
Delhi Election Results | महाराष्ट्रातून नेत्यांची रसद पुरवूनही दिल्लीत भाजप अपयशी