नवी दिल्ली : मनी लाँन्ड्रिंगप्रकरणी सीबीआय विशेष न्यायालयाने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने रॉबर्ट वाड्रा यांना परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे रॉबर्ड वाड्रा आता 6 आठवड्यांसाठी परदेशात जाऊ शकतात.


रॉबर्ड वाड्रा यांनी वैद्यकीय उपचारासाठी परदेशाचा जाण्याची मुभा मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने ही परवानगी दिली आहे. रॉबर्ट वाड्रा यांचे वकील केटीएस तुलसी यांनी सुप्रीम कोर्टात एका जुन्या खटल्याचा दाखला देत, रॉबर्ट वाड्रा यांना परदेशात जाण्याची परवानगी मिळावी यासाठी विनंती केली होती.


रॉबर्ड वाड्रा देश सोडून जाऊ शकतात


रॉबर्ड वाड्रा यांच्या आतड्यांमध्ये गाठ आहे. यावर उपचारासाठी वाड्रा यांना परदेशात जाण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केली आहे. वाड्रा चौकशीसाठी नेहमी सहकार्य करतात, त्यामुळे ते भारतातून पळून जाण्याचा विचार करु शकत नाहीत, असं त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केलं.


काय आहे प्रकरण ?


शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या दलालाकडून लंडनमध्ये बेहिशेबी मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप वाड्रांवर करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 2009 साली झालेल्या एका शस्त्रास्त्रांच्या व्यवहारात शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या दलालाकडून वाड्रा यांनी लंडनमध्ये बेहिशोबी मालमत्ता खरेदी केली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या खरेदी केलेल्या घराचा पत्ता 12, एलरटन हाउस, ब्रायनस्टन स्क्वेअर, लंडन असा देण्यात आला आहे.


रॉबर्ट वाड्रा आणि त्यांचे सहाय्यक मनोज आरोरा यांच्याकडून पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये अर्थिक देवाण-घेवाण आणि लंडनमधील घराच्या नुतनीकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे. यासाठी तब्बल 19 पाउंड म्हणजे म्हणजे 19 कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. हा व्यवहार ऑक्टोबर 2009 मध्ये करण्यात आला असून जून 2010 मध्ये याची विक्री करण्यात आली.