नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील बुराडी इथं एकाच कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. 1 जुलैला हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर आता त्याबाबतची नवनवी माहिती समोर येत आहे.

या 11 जणांचा मृत्यू अंधश्रद्धेतून झाल्याची चर्चा आहे. त्याचं कारण म्हणजे घरातून एक रजिस्टर/नोंदवही मिळाली आहे. या नोंदवहीत कोणी कसं मरायचं आणि कोणाची मरणाची जागा कुठे असेल, याबाबतचा उल्लेख आहे. इतकंच नाही तर मृत्यूसाठी स्टूलचा वापर करु, डोळे बंद करु आणि हात बांधले तर आपल्याला मोक्ष मिळेल, असा उल्लेख या वहीत आहे.

महत्त्वाचं म्हणजे नोंदवहीतील उल्लेखाप्रमाणेच सर्व 11 मृतदेह त्या अवस्थेतच होते.

शवविच्छेदन अहवाल

या सर्व मृतदेहांचं शवविच्छेदन केल्यानंतर, सर्वांनी गळफास घेऊनच आयुष्य संपवल्याचं समोर आलं आहे. शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नाहीत.

दरम्यान, नातेवाईकांनी सर्वांचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

 रजिस्टरमध्ये काय लिहिलंय?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील रजिस्टरमध्ये मोक्ष प्राप्तीचा मार्ग सांगण्यात आला आहे. “जर तुम्ही स्टूल वापरुन, डोळे बंद करुन आणि हात बांधाला, तर मोक्ष मिळेल”असं या रजिस्टरमध्ये म्हटलं आहे.

अंधश्रद्धेच्या बाजूने तपास

नोंदवहीतील उल्लेखाप्रमाणेच सर्व 11 मृतदेह स्टूल वापरुन, डोळे बंद करुन आणि हात बांधालेल्या अवस्थेत लटकलेले होते. त्यामुळे पोलिसांनी अंधश्रद्धेच्या अँगलने तपास सुरु केला आहे. सुरुवातील पोलिसांनी सामूहिक आत्महत्या असल्याची शक्यता वर्तवली होती. मात्र रजिस्टर मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आहे.

सुशिक्षित कुटुंब

या 11 मृतांमध्ये जी वयस्कर महिला आहे, त्यांची दुसरी मुलगी सुजाता हरियाणाच्या पानिपतमध्ये राहते. त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी दिलेली माहिती आश्चर्यकारक आहे. हे कुटुंब धार्मिक जरुर होतं, मात्र अंधविश्वासू नव्हतं, असं त्यांनी सांगितलं.

आमचं कुटुंब सुशिक्षित आणि आनंदी होतं. आमची कोणावर शंका नाही, असं सुजाता यांनी सांगितलं.

नुकताच साखरपुडा झालेल्या तरुणीचा मृतदेह

मृत्यूमुखी कुटुंबात 17 जूनला साखरपुड्याचा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात अनेक नातेवाईकही सहभागी झाले होते. या कार्यक्रमात कुटुंबीयांनी धमाल मस्ती केली होती, त्याचे फोटो समोर आले आहेत. जे 11 मृतदेह मिळाले आहेत त्यापैकीच प्रियांकाचा हा साखरपुडा होता.


7 महिला, 4 पुरुष

1 जुलैची राजधानी दिल्लीतील सकाळच एका खळबळजनक घटनेने उजाडली. बुराडी भागातील एकाच घरात 11 मृतदेह सापडले. मृतांमध्ये भाटिया कुटुंबातील सात महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. मृतांमधील सर्व एकाच कुटुंबातील सदस्य आहेत.

यापैकी काही मृतदेह लटकलेल्या अवस्थेत तर काही जमिनीवर आढळले. त्यांचे हात-पाय बांधलेले आणि डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती. भाटिया कुटुंबाचं बुराडीतील संतनगरमध्ये दोन मजली इमारतीत ग्रॉसरी आणि प्लायवूडचं दुकान होतं.

घटना कशी समजली?
भाटिया कुटुंब रोज सकाळी 6 वाजता दुकान उघडत असे, मात्र रविवारी सकाळी 7.30 वाजेपर्यंत दुकान बंद होतं. त्यामुळे शेजाऱ्याने दुकान का बंद आहे हे चौकशी करण्यासाठी त्यांच्या घरात डोकावून पाहिलं. त्यावेळी त्यांना भाटिया कुटुंबातील अनेक मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसले. त्यानंतर शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

संबंधित बातम्या

खळबळजनक घटनेने दिल्ली हादरली, एकाच घरात 11 मृतदेह