हॉलंड : हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्याचं भारताचे स्वप्न अखेर अधुरं राहिलं. या स्पर्धेत भारताला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. ऑस्ट्रेलियानं भारताचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-1 ने पराभव केला.

या विजयासह ऑस्ट्रेलियाने पंधराव्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम गाजवला. तर भारताला आत्तपर्यंत एकही वेळा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरता आले नाही. हा सामना हॉलंडमधील ब्रेडा शहरात खेळला गेला.

ऑस्ट्रेलिया आणि भारताने सामन्यात निर्धारित वेळेत प्रत्येकी 1-1 गोल करत बरोबरी केली. त्यामुळे सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत गेला. ऑस्ट्रेलियाने पेनल्टी शूटआऊटचा पुरेपूर फायदा उचलला आणि विजयी गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. परंतु भारताला मिळालेल्या संधीचा फायदा घेता आला नाही. पहिल्या तीनही संधी मध्ये भारताने एकही गोल केला नाही. भारतातर्फे फक्त मनप्रित सिंहलाच गोल करण्यात यश मिळाले.