नवी दिल्ली : ''बुलेट ट्रेन ही श्रीमतांच्या प्रवासाचं साधन असून ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. बुलेट ट्रेन असलेल्या देशांच्या तुलनेत भारत अजून 20 वर्षे मागे आहे. भारतीयांना आधुनिक, सुरक्षित आणि तीव्र रेल्वे व्यवस्थेची जास्त गरज आहे,'' असं देशाचे मेट्रो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले इलात्तुवपिल श्रीधरन यांनी म्हटलं आहे.

एका मुलाखतीत श्रीधरन यांनी बुलेट ट्रेनबाबत आपलं मत मांडलं. बुलेट ट्रेनचा प्रवास प्रचंड महागडा आहे, असं ते म्हणाले. श्रीधरन देशातील अनेक मेट्रो प्रकल्पांचे सल्लागार इंजिनिअरही आहेत. भारतीय रेल्वेने बायो-टॉयलेट, वेग आणि स्वच्छतेच्या बाबतती प्रगती केली असल्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला.

बायो-टॉयलेटशिवाय भारतात कोणतीही तांत्रिक प्रगती झालेली नाही. वास्तव हे आहे, की अनेक प्रसिद्ध ट्रेनचा सरासरी वेगही कमी झाला आहे. समयबद्धता कमी झाली आहे. अधिकृतपणे 70 टक्के ट्रेन वेळेवर धावतात असा दावा केला जातो. मात्र वास्तवात केवळ 50 टक्के ट्रेनच वेळेवर धावतात, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, रेल्वे दुर्घटनांच्या बाबतीत कोणतीही सुधारणा झाली नसल्याचं श्रीधरन म्हणाले. याउलट ट्रॅक आणि रेल्वे क्रॉसिंगवर जास्त लोकांचा मृत्यू होत आहे. दरवर्षी 20 हजार लोकांचा रेल्वे ट्रॅकवर मृत्यू होतो. भारतीय रेल्वे प्रगत देशांच्या बाबतीत 20 वर्षांनी मागे आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

कोण आहेत श्रीधरन?

ई श्रीधरन यांना मेट्रो मॅन म्हणून ओळखलं जातं. देशातील रेल्वेच्या अनेक मोठ्या प्रकल्पांचं श्रेय त्यांना जातं. ते 1995 ते 2012 या काळात दिल्ली मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक असतानाच त्यांच्या नेतृत्त्वात दिल्लीतील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली दिल्ली मेट्रो आणि त्यापूर्वी कोकण रेल्वे चालू करण्यात आली.

भारत सरकारकडून श्रीधरन यांना 2001 साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं, तर 2008 साली त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आला. शिवाय 2005 साली फ्रान्स सरकारकडूनही त्यांना सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. टाइम मासिकाने त्यांचा आशियातील हिरो असा उल्लेख केला होता. संयुक्त राष्ट्राच्या सचिवांनी सध्या त्यांची नियुक्ती यूएनच्या शाश्वत वाहतुकीसाठी असलेल्या उच्चस्तरीय सल्लागार समितीच्या सदस्यपदी केली आहे.

श्रीधरन यांच्या नेतृत्त्वातील मुख्य रेल्वे प्रकल्प

1970 साली देशातील पहिला मेट्रो प्रकल्प असलेल्या कोलकाता मेट्रोचं काम त्यांनी हाती घेतलं. त्यांच्याच कार्यकाळात हा प्रकल्प पूर्ण झाला.

कोची शिपयार्डमध्ये पहिलं जहाज श्रीधरन यांच्याच नेतृत्त्वात बांधण्यात आलं.

1990 साली निवृत्तीनंतरही त्यांची कोकण रेल्वेचे सीएमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली. देशातील सर्वात कठीण मानला जाणारा कोकण रेल्वेचा प्रकल्प त्यांनी विक्रमी वेळेत पूर्ण केला.

दिल्ली मेट्रोचं श्रेय श्रीधरन यांनाच जातं.

कोची मेट्रो सुरु करण्यामध्येही श्रीधरन यांचा मोलाचा वाटा आहे.

लखनौ मेट्रोचे मुख्य सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.