Delhi Air Pollution : दिवाळीपासून वायू प्रदूषणाशी झुंजणाऱ्या दिल्ली आणि आसपासच्या परिसराला अद्याप दिलासा मिळालेला नाही. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (Safar) ने सांगितले आहे की, आज सकाळी 6 वाजता राजधानी दिल्लीत एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 362 वर नोंदवला गेला आहे. याचाच अर्थ आजही दिल्लीची हवेची गुणवत्ता 'अत्यंत खराब' आहे.
दिल्लीच्या सीमेवर ट्रकला ‘नो एन्ट्री’
प्रदूषण रोखण्यासाठी सीमेवर ट्रकला ‘नो एन्ट्री’ करण्यात आली आहे. याबाबतच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. पोलिसांकडून टिकरी सीमेवर अनावश्यक ट्रक थांबवले जात आहेत. दिल्ली सरकारने बुधवारी एक आदेश जारी करून इतर राज्यांतून दिल्लीत येणाऱ्या सर्व ट्रक (अत्यावश्यक ट्रक वगळता) 21 नोव्हेंबरपर्यंत दिल्लीत प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.
हवेच्या गुणवत्तेत काहीशी सुधारणा
राजधानी दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेत थोडीशी सुधारणा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 24 तासातील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) बुधवारी 375 असल्याचं नोदंवलं गेलं. तर एक दिवस आधी हाच निर्देशांक 403 होता. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार रविवारपर्यंत हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होण्याची शक्यता कमीच आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने सांगितले की राजधानीचे किमान तापमान 9.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे, जे सामान्यपेक्षा तीन अंशांनी कमी आहे. जे आतापर्यंतच्या हंगामातील सर्वात कमी तापमान आहे. कमाल तापमान 27.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
पुढील आदेश येईपर्यंत सर्व खासगी शाळा, महाविद्यालये बंद
देशाच्या राजधानीत सतत वाढत असलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या समितीने दिल्ली-एनसीआरमधील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच पुढील आदेश येईपर्यंत ऑनलाइन वर्ग सुरू राहणार आहे. प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने पुढील आदेश येईपर्यंत सर्व खासगी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
21 नोव्हेंबरपर्यंत सर्व प्रकारच्या बांधकामांवर बंदीआपल्या आदेशात CAQM म्हणाले की, दिल्ली-NCRमध्ये 21 नोव्हेंबरपर्यंत सर्व प्रकारच्या बांधकामांवर बंदी घालण्यात आली आहे. तथापि, रेल्वे, मेट्रो, विमानतळ, बस टर्मिनल आणि संरक्षणाशी संबंधित प्रकल्प या बंदीच्या बाहेर राहतील आणि धूळ नियंत्रण नियमांनुसार त्यांची कामं चालू राहतील. तसेच धूळ रोखण्यासाठी पाणी शिंपडणे आणि अँटी स्मॉग गनही तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :