नवी दिल्ली : एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला, आत्महत्या किंवा अनैसर्गिक मृत्यूने कुटुंबीय आधीच दु:खात असतात. मात्र कुटुंबियांना आणखी दु:ख मृतदेहाचं पोस्टमॉर्टम झाल्यानंतर होतं. पोस्टमॉर्टम म्हणजे शरीराचे विच्छेदन. हे टाळण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने (एम्स) जिथे शक्य असेल तेथे व्हर्च्युअल अॅटॉप्सी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांच्या हस्ते शनिवारी या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले.


व्हर्च्युअल अॅटॉप्सीमध्ये शरीराला स्पर्श न करता अंतर्गत अवयव, हाडे इत्यादींची तपासणी केली जाते. या प्रक्रियेअंतर्गत मृतदेह एका पिशवीत पॅक केला जातो आणि सीटी स्कॅन मशीनमध्ये ठेवला जातो. त्यानंतर काही सेकंदात अंतर्गत अवयवांच्या हजारो इमेजेस कॅप्चर केल्या जातात. ज्याचे विश्लेषण फॉरेन्सिक तज्ञांकडून केले जाऊ शकते.


अशा सुविधा पुरवणाऱ्या निवडक संस्थांमध्ये एम्सचा समावेश 


एम्समधील फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले की, ही सुविधा देणारी एम्स ही दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियातील पहिली वैद्यकीय संस्था असेल. स्वित्झर्लंड, अमेरिका आणि ब्रिटन यासारख्या विकसित देशांनी निवडक प्रकरणांमध्ये अॅटॉप्सी करण्यासाठी आधीपासूनच इमेजिंग तंत्रज्ञान स्वीकारले आहे.


एम्समध्ये दरवर्षी 3000 पोस्टमॉर्टम केले जातात


एम्समध्ये दरवर्षी सुमारे 3000 पोस्टमॉर्टम केले जातात. डॉ. गुप्ता म्हणाले की, यातील 30 ते 50 टक्के प्रकरणांमध्ये चिरफाड करण्याची आवश्यकता नसते. यामध्ये अपघात, फाशी किंवा आत्महत्या यामुळे मृत्यूचा समावेश आहे. बर्‍याच केसेसमध्ये मृत्यूचे कारण शोधण्यासाठी शरीर कापून उघडण्याची गरज नसते आणि आभासी अॅटॉप्सी पुरेशी असते.