पाटना :  बिहारमधील मुजफ्फरपूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये चमकी तापेचा कहर आहे. यामुळे जवळपास 69 बालकांचा मृत्यू झाला आहे. बिहारच्या मुजफ्फरपूर येथील सिव्हिल सर्जन डॉ. शैलेष प्रसाद सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे.


या तापाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.  या तापामुळे पीडित असलेली मुले 4 ते 14  वयोगटातील आहे.

एक्यूट इंसेफलाइटिस सिंड्रोम म्हणजे चमकी ताप आल्यामुळे आतापर्यंत 69 बालकांचा जीव गेला आहे. यामधील 58 बालकांचा मृत्यू हा श्रीकृष्ण मेडिकल कॉलेजमध्ये तर 11 बालकांचा मृत्यू केजरीवाल हॉस्पीटलमध्ये झाला आहे, अशी माहिती शैलेष प्रसाद सिंह यांनी दिली आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडेय यांनी मात्र या प्रकरणी बोलताना अकलेचे तारे तोडले आहेत. मंगल पांडेय यांनी बालकांच्या मृत्यूला नियती आणि निसर्ग जबाबदार आहे, असे म्हटले आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन उद्या, रविवारी मुजफ्फरपूरला जाणार आहेत.  चमकी तापेच्या प्रकोपाने पीडित भागाला ते भेट देणार आहेत.

या तापामुळे आजारी असलेली बरीच मुले मुजफ्फरपूरच्या श्रीकृष्ण मेडिकल कॉलेज अ‍ॅन्ड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या तापाचा प्रकोप उत्तर बिहारमधील सीतामढी, शिवहर, मोतिहारी, वैशाली जिल्ह्यांत अधिक आहे. एईएस (एक्टूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम) आणि जेई (जपानी इंसेफलाइटिस) असे नाव असलेल्या तापास बिहारमध्ये ‘चमकी बुखार’ म्हणून ओळखतात. या चमकी तापाने सध्या बिहारच्या काही भागात कहर केला आहे.