मुंबई : 'वायू' चक्रीवादळाने पुन्हा आपला मार्ग बदलला आहे, त्यामुळे गुजरातवरील संकट अद्याप कायम आहे. चक्रीवादळ येत्या 48 तासात गुजरातच्या कच्छ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वायू चक्रीवादळ 16 जूनला आपला मार्ग बदलेल आणि 17-18 जूनपर्यंत कच्छच्या परिसरात दाखल होईल. मात्र यावेळी चक्रीवादळाची तीव्रत कमी होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ 'डीप डिप्रेशन' म्हणून किनारपट्टी भागात पोहचण्याची शक्यता आहे.


गुजरात सरकारने वायू चक्रीवादळाने मार्ग बदलण्याची शक्यता वर्तवत अलर्ट जारी केली आहे. दोन दिवसांपूर्वी गुरुवारी हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टी भागात धडकणार होतं, मात्र अचानक मार्ग बदलण्याने गुजरावरील संकट तात्पुरतं टळलं होतं. मात्र हे संकट पुन्हा एकदा उभं राहिलं आहे.


चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागातील जवळपास 2.75 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. मात्र चक्रीवादळाने मार्ग बदलल्याने पुन्हा नागरिकांना घरी परतण्याच्या सूचना गुजरात सरकारने दिल्या. याशिवाय शाळा-कॉलेजनाही सुट्टी देण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी म्हणजे आज शाळा-कॉलेज नियमीत सुरु करण्यात आले.


केंद्र आणि राज्य सरकारने वादळामुळे अनेक सार्वजनिक वाहतूक सेवा रद्द केल्या होत्या. पश्चिम रेल्वेने गुजरातच्या किनारपट्टीवरुन जाणाऱ्या 58 ट्रेन 15 जूनपर्यंत रद्द केल्या आहेत. मात्र चक्रीवादळाने पुन्हा आपला मार्ग बदलल्याने गुजरात सरकार पुन्हा एकदा सज्ज झालं आहे.