बडोदा : गुजरातच्या बडोद्यामध्ये एका हॉटेलच्या सेप्टिक टॅंकची साफसफाई करताना गुदमरून सात कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चार सफाई कर्मचाऱ्यांसह अन्य तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने बडोद्यामध्ये खळबळ उडाली आहे.


बडोद्यानजीक फरटीकुई गावात हॉटेलच्या आतील सेप्टिक टॅंक साफ करताना ही दुर्घटना घडली.  या सात जणांमधील तीन जण हॉटेलचे कर्मचारी आहेत. अजय वसावा (24), विजय चव्हाण (22) आणि सहदेव वसावा (22) अशी त्यांची नावे आहेत. तर अन्य चार सफाई कामगार होते. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.

घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे, मात्र अद्याप कुणालाही अटक केलेली नाही.  चार सफाई कामगारांना या सेप्टिक टॅंकच्या सफाईचे काम देण्यात आले होते. त्यातील एक पहिल्यांदा टॅंकमध्ये गेला.

मात्र, सेप्टिक टँकमध्ये गॅस असल्याने तो गुदमरून पडला. खूप वेळ झाल्यानंतरही तो बाहेर न आल्याने बाकीचे कामगार देखील आत उतरले. ज्यामुळे त्यांचाही मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक कल्पेश सोलंकी यांनी दिली आहे.