मुंबई : आपण सगळे नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर आहोत. सरत्या वर्षाला टाटा-बाय बाय करताना नवीन वर्षात तुम्ही काही गोष्टींना मुकणार आहात. एक म्हणजे तुमचं चीप नसलेलं एटीएम किंवा क्रेडीट कार्ड तुम्हाला वापरता येणार नाही. त्याचप्रमाणे जुन्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही.


मॅगस्ट्राईप कार्ड

जर तुम्ही जुनं मॅगस्ट्राईप डेबिट (एटीएम) किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर तुम्हाला ते 1 जानेवारीपासून वापरता येणार नाही. जुनी मॅग्नेटिक स्ट्राईप डेबिट आणि क्रेडिट कार्ड 31 डिसेंबरला बंद होणार असून ग्राहकांना ती बदलून घेण्याचे निर्देश आरबीआयने दिले आहेत.

जुनी कार्ड बदलण्याची प्रक्रिया 31 डिसेंबरपूर्वीच करण्यास सांगण्यात आलं होतं. यानंतर मॅग्नेटिक स्ट्राईप असणारी सर्व कार्ड्स ब्लॉक करण्यात येतील.

व्हॉट्सअॅप

व्हॉट्सअॅप आता आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग होत चालला आहे. परंतु जर हे व्हॉट्सअॅप आपल्या मोबाईलमध्ये वापरता आले नाही तर मोठी पंचाईत होऊ शकते. 31 डिसेंबरनंतर जुन्या ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या नोकिया, अॅन्ड्रॉईड आणि अॅपल कंपनीच्या मोबाईल्समध्ये व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही.

नोकिया मोबाईल्समध्ये एस 40 ही ऑपरेटिंग सिस्टिम एके काळी खूप लोकप्रिय होती. या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणाऱ्या फोनमध्ये 31 डिसेंबरनंतर व्हॉट्सअॅप चालणार नाही. तसेच अॅन्ड्रॉईड 2.3.7 आणि जुन्या व्हर्जनसोबत आय फोन आयओएस 7 वर 1 फेब्रुवारी 2020 नंतर व्हॉट्सअॅप चालणार नाही.

आयफोन बॅटरी बदलण्याची संधी

आयफोन यूझर्सना मोबाईलची बॅटरी बदलण्याची शेवटची संधी होती. 'अॅपल'कडून जगभरातील यूझर्ससाठी बॅटरीच्या किंमती कमी करण्यात आल्या होत्या. 31 डिसेंबर 2018 पर्यंत ही ऑफर मर्यादित होती.

आयफोनच्या जुन्या मॉडेलमधील बॅटरीमुळे मोबाईलच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे हे लक्षात आल्यानंतर अॅपलकडून बॅटरी बदलण्यासाठी यूझर्सना आवाहन करण्यात आलं होतं. तसेच बॅटरीच्या किंमतीवरही मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली होती.

आयटीआर रिटर्न

जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे आयकर परतावा भरण्याची 31 ऑगस्ट 2018 चुकवली होतीत, आणि आताची 31 डिसेंबरची तारीखही 'मिस' केली असेल, तर तुम्हाला भरभक्कम दंड भरावा लागणार आहे.

1 जानेवारी 2019 ते 31 मार्च 2019 या कालावधीत उशिराने भरलेल्या आयकर परताव्यासाठी दुप्पट दंड आकारला जाणार आहे. 31 डिसेंबरपूर्वी पाच हजार रुपयांचा दंड आता दहा हजारांवर जाणार आहे.