दरवर्षी वर्ष संपत आलं की गुगल आपली यादी जाहीर करतं. ही यादी असते ती गुगलवरील 'मोस्ट सर्च्ड पर्सनॅलिटीज'ची. वर्षभरात नेटकऱ्यांनी कोणाला सर्वात जास्त 'सर्च' केलं त्याचा हा अहवाल असतो. तसा २०१८ चा अहवाल आलाय आणि तो ऐकाल तर थक्क व्हाल. कारण, गेल्या वर्षी गुगल सर्चिंगमध्ये अव्वल असलेल्या सनी लिओनीला आता पायउतार व्हावं लागलं आहे. पहिला नंबर सोडाच, पण पहिल्या दहातही सनी नाही. तिची जागा घेणाऱ्या व्यक्तिमत्वाचं नाव ऐकाल तर पुन्हा एकदा तुम्हाला जोर का झटका बसेल. कारण २०१८ मध्ये मोस्ट सर्च्ड ठरली आहे प्रिया वाॅरिअर. हो हो.. तीच हळूच डोळा मारणारी मुलगी.


त्यानंतर नंबर लावला आहे निक जोनसने. प्रियांकाने लग्नाची अनाउन्समेंट केल्यावर लगेच कोण आहे हा नवरोबा म्हणत भारतीयांनी त्याची कुंडलीच गुगुलमधून शोधून काढलेली दिसते. त्यानंतर नृत्यांगना सपना चौधरी, प्रियांका चोप्रा, आनंद आहुजा, सारा अली खान, सलमान खान, मेघन मार्कल, अनुप जलोटा, बोनी कपूर या मंडळींचा नंबर लागतो.

गंमत अशी की आमीर खान, शाहरूख खान, कतरिना कैफ, अनुष्का-विराट यांना या यादीतून डच्चू मिळाला आहे.

गेल्या वर्षी गुगलने जाहीर केलेल्या यादीत सनी अव्वल स्थानावर होती. तिच्या मागे अर्शी खान, सपना चौधरी, विद्या व्होक्स, दिशा पटानी, सुनील ग्रोव्हर, शिल्पा शिंदे, सागरिका घाटगे, राणा डुग्गुबत्ती यांचा शिरकाव झाला होता. यंदाच्या म्हणजे, २०१८ च्या यादीत यातल्या अनेक मंडळींना बाहेर बसावं लागलं आहे. अपवाद आहे तो केवळ सपना चौधरीचा.