मुंबई: उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचं आज अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनाने उद्योगविश्वावर शोककळा पसरली आहे. सायरस पालनजी मिस्त्री, 54 वर्षांचा तरुण उद्योजक... जितका हरहुन्नरी तितकाच वादग्रस्तही. सायरस मिस्त्री यांच्यावर उद्योग क्षेत्रातले अनेक विक्रम आहेत. तसेच त्यांच्यावर अनेक आरोपही आहे.


सायरस मिस्त्री यांची 2006 साली टाटा सन्सच्या (Tata Group) बोर्डात एन्ट्री झाली. 2013 साली त्यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. वयाच्या 43 व्या वर्षी ते टाटा समूहाचे अध्यक्ष बनले. टाटा समूहाचे पहिले बिगर टाटा अध्यक्ष बनले. सायरस मिस्त्री टाटा ग्रुपचे सगळ्यात तरुण अध्यक्ष होते. पण त्यांच्या कार्यपद्धतीवर बोर्ड मेंबर्स नाराज झाले. मग 2016 साली झालेल्या वादानंतर मिस्त्रींना अध्यक्षपदावरुन हटवलं.


सायरस मिस्त्री जेव्हा टाटा सन्सचे अध्यक्ष झाले तेव्हापासून त्यांची कारकीर्द वादळी ठरली. टाटा समूहाच्या बोर्ड मेंबर्सनी सायरस मिस्त्री यांच्यावर सहा आरोप केले. त्यामुळेच त्यांना टाटा सन्सचे अध्यक्षपद केवळ चार वर्षातच सोडावं लागलं. 


बोर्डने सायरस मिस्त्री यांच्यावर नेमके काय आरोप केले? 


1. नफा मिळवून देणाऱ्या कंपन्यांकडेच लक्ष दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. 


2. तोट्यात असलेल्या परदेशी कंपन्यांमध्ये भागीदारी विकल्याचा मिस्त्रींवर आरोप होता.


3. मिस्त्री यांच्या कारभारावर टाटा समूह बोर्डातील इतर सदस्य नाराज होते.


4. त्यांच्यावर कंपनीची प्रतिमा मलीन केल्याचाही आरोप झाला. 


5. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला नुकसान पोहोचवल्याचाही आरोप करण्यात आला


6. सायरस मिस्त्री यांचा काळात कंपनीच्या उत्पन्नात घट झाली तर कर्ज वाढल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. 


टाटा सन्सच्या बोर्डाची 24 ऑक्टोबर 2016 रोजी बैठक झाली. त्यात मतदान झालं आणि सायरस मिस्त्रींना पदावरुन दूर करण्यात आलं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सायरस मिस्त्री विरुद्ध रतन टाटा असा संघर्ष सुरु झाला. संस्थेच्या कारभारात अनियमितता असल्याचा मिस्त्रींनी आरोप केला. 


टाटा आणि मिस्त्री यांच्यातील हा वाद नॅशनल कंपनी लॉ अपीलेट ट्रिब्यूनलमध्ये पोहोचला. नॅशनल कंपनी लॉ अपीलेट ट्रिब्यूनलमध्ये सायरस मिस्त्रींना तिथं दिलासा मिळाला. पण प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर वाद चिघळला. 2021 मध्ये सुप्रीम कोर्टानं टाटा ग्रुपच्या बाजूनं निकाल दिला. त्यानंतरही सायरस मिस्त्री यांनी आपला लढा सुरुच ठेवला. पण मे 2022 मध्ये सायरस मिस्त्री यांची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आणि एक मोठा लढा थांबला.