पालघर :  उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघात झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पालघर जिल्हा अधीक्षकांनी ही माहिती दिली आहे. अपघात झाल्यानंतर सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सायरस मिस्त्री हे 2013 ते 2016 या दरम्यान टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी होते. 


आज दुपारी सव्वातीन वाजल्याच्या सुमारास अहमदाबादवरुन ते मुंबईला येत होते. त्यावेळी हा अपघात झाल्याची माहिती आहे. मर्सिडिस गाडीतून ते प्रवास करत होते. डिव्हायडला गाडी धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पालघर पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.


अपघात झाल्यानंतर गाडीतील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  


 






कोण आहेत सायरस मिस्त्री?


मुंबईत पारसी कुटुंबात सायरस मिस्त्री यांचा जन्म झाला. उद्योगपती पालनजी मिस्त्री यांचे ते सुपूत्र होते. त्यांचे शिक्षण लंडन बिझनेस स्कूलमध्ये झाले. लंडनच्या इंपीरियल कॉलेजमधून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं. 


सायसर मिस्त्री हे 2006 साली टाटा समूहाचे सदस्य बनले. वयाच्या 43 व्या वर्षी 2013 साली ते टाटा समुहाचे अध्यक्ष बनले. 2016 साली झालेल्या वादानंतर मिस्त्रींना अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं. 


सायसर मिस्त्री हे शापूरजी पालनजी समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. शापूरजी पालनजी उद्योग समूहाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली आहे. सायरस मिस्त्री यांचे आजोबा शापूरजी मिस्त्री यांनी 1930 मध्ये त्यांचा कौटुंबिक व्यवसाय सुरू केला. आणि त्याच वेळी त्यांनी दोराबजी टाटा यांच्याकडून टाटा समूहातील भागभांडवल विकत घेतले होते. त्यांनी टाटा समूहातील 18.5 टक्के हिस्सा खरेदी केला होता. मिस्त्री कुटुंब हे एकमेव कुटुंब आहे ज्यात त्यांनी टाटा समूहात भागीदारी केली आहे. याशिवाय 66 टक्के हिस्सा टाटा समूहाच्या विविध ट्रस्टकडे आहे. सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे सहावे चेअरमन होते.  


पालोनजी ग्रुपचा व्यवसाय कापडापासून रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस ऑटोमेशनपर्यंत पसरलेला आहे. SPG समुहामध्ये शापूरजी पालोनजी अभियांत्रिकी आणि बांधकाम, Afcons इन्फ्रास्ट्रक्चर, Forbes Textiles, Gokak Textiles, Eureka Forbes, Forbes & Co, SP Construction Materials Group, SP रिअल इस्टेट आणि नेक्स्ट जेनसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.