Terrorist Attacked CRPF Team : जम्मू आणि काश्मीरमध्ये तणाव वाढताना दिसत आहे. शोपियान जिल्ह्यात रविवारी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर प्रत्युत्तरात दाखल झालेल्या गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू झाला. स्थानिक रहिवाशांनी या घटनेचा निषेध केला, त्यानंतर अधिकाऱ्यांनी या घटनेच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा आणि शोपियान दरम्यानच्या सीमावर्ती भागात तुर्कवांगम-लिटर येथे दुपारी 1 वाजेच्या सुमारात दहशतवाद्यांनी पोलीस आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त तळावर गोळीबार केला. 


पोलिसांनी माहिती दिली की, 'सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात एक नागरिक गंभीर जखमी झाला. शोपियानमधील तुर्कवांगम येथील रहिवासी शोएब अहमद गनई या जखमी नागरिकाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला.' शोपियानच्या अधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.


सुरक्षा दलांवर नागरिकांच्या हत्येचा आरोप
शोपियांचे जिल्हा दंडाधिकारी सचिन कुमार यांनी सांगतले, 'शोपियानच्या तुर्कवांगम भागातील घटनेची दंडाधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. दंडाधिकाऱ्यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.


पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, चकमकीनंतर दहशतवादी जवळच्या बागेत पळून गेले. पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून शोध मोहीम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.


स्थानिकांकडून घटनेचा निषेध
सुरक्षा दलांनी नागरिकाला गोळ्या घालून ठार केल्याचा आरोप करत स्थानिकांनी या घटनेचा निषेध केला. स्थानिकांनी दावा केला आहे की, 'सुरक्षा दल शोधात होते. शोधादरम्यान गणईने सुरक्षा तपासणीसाठी आपले दोन्ही हात वर केले परंतु त्यांनी त्याच्यावर गोळीबार केला.'