मुंबई : मुलुंडमधील एम टी अगरवाल रुग्णालयाच्या पुनर्निर्माणावरुन मनसे आणि भाजपमध्ये श्रेयवाद रंगला आहे. मुंबई महापालिका सुमारे 350 कोटी रुपये खर्च करुन हे रुग्णालय नव्याने उभारत आहे. परंतु या रुग्णालयाचे श्रेय नक्की कोणाचे यावरुन मुलुंडमधील नागरिक मात्र संभ्रमात आहेत. कारण या ठिकाणी भाजपच्या नगरसेविका समिता कांबळे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आपापले श्रेयाचे फ्लेक्स लावले आहेत.


या रुग्णालयाच्या भूमीपूजन कार्यक्रम आज खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते होणार होता. परंतु त्याआधीच मनसेने या ठिकाणी भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पाडला. या वेळी मनसे कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.

भाजप-मनसेचे प्रयत्न
ठाणे, मुलुंड, भांडुप अशा विविध भागातील रुग्ण या रुग्णालयात येतात. परंतु पाच वर्षांपासून रुग्णालयाची इमारत धोकादायक झाल्याने तसंच सुविधांची वाणवा असल्याने नागरिक त्रस्त होते. या विरोधात मनसेने तीन वेळा मोर्चे काढून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला होता. तर भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी लाक्षणिक उपोषण, पाहणी दौरे केले होते. अखेर रुग्णालय स्थलांतरीत करुन ही इमारत मोकळी करण्यात आली. आता ही धोकादायक इमारत पाडून या ठिकाणी दहा मजली नवी सुसज्य रुग्णालयाची इमारत उभी राहणार आहे.

स्थानिक नगरसेविका समिता कांबळे त्यांच्या प्रयत्नातून हे नवे रुग्णालय साकारण्यात येणार असल्याचं फलक मुलुंडमध्ये लावल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आणि स्वतःच या ठिकाणी भूमीपूजन केलं.

रुग्णालयाचं बांधकाम रखडलं
मुलुंड पूर्व इथलं एम टी अगरवाल रुग्णालय 200 खाटांचं असून त्याचं 470 खाटांचं सुपर स्पेशालिटी रुग्णालय करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पाच एकरवर असलेलं हे रुग्णालय आणि बाजूचे भूखंड एकत्र करुन अद्ययावत रुग्णालय आणि नर्सिंग होम बांधण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. यासाठी महापालिकेने अर्थसंकल्पात 350 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

हायटेक सुविधायुक्त रुग्णालय बांधणार
मुंबईच्या पूर्व उपनगरातील तब्बल 12 लाख रुग्णांना या रुग्णालयाचा फायदा होणार आहे. यामुळे मुंबईतील सायन, नायर आणि केईएम रुग्णालयावरचा ताणही कमी होईल. महापालिका इथे दहा मजली इमारत बांधणार आहे. तसंच मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर सिस्टम, मेडिकल गॅस सिस्टम आणि न्यूमॅटिक ट्यूब यांसारख्या हायटेक सुविधा रुग्णालयात असतील. हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.