corona Vaccination अर्थात कोरोना लसीकरणाची आजपासून (16 जानेवारी 2021) देशभरात सुरुवात होणार आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी लसीकरणाचा शुभारंभ करणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात पहिल्या दिवशी देशातील जवळपास 3 लाख आरोग्य सेवा कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांना लसीकरणाचा लाभ मिळणार आहे. देशभरात असणाऱ्या 2934 केंद्रांवर हे लसीकरण पार पडणार आहे.


लसीकरणाच्या प्रत्येक सत्रात जास्तीत जास्त 100 लाभार्थींना लस देण्याचं लक्ष्य असणार आहे. ज्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. निर्धारित आकड्याशिवाय इतर कोणत्याही प्रकारे आखणी करण्यात न आलेल्या मार्गानं लसीकरण न करण्याचे सक्तीचे निर्देश आरोग्य मंत्रालयानं दिले आहेत.


लस मिळणारे हे (Frontline Workers) फ्रंटलाईन वर्कर्स आहेत तरी कोण?


- भारतीय लष्कर, वायुसेना, नौदल आणि तटरक्षक दलाच्या सेवेतील व्यक्ती.
- बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एनएसजी, एसएसबी, एआर या सेवांमध्ये असणाऱ्या व्यक्ती.
- आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सेवेत असणाऱ्या व्यक्ती.
- महानगरपालिका कर्मचारी.
- सिव्हील डिफेन्सच्या सेवेत असणाऱ्या व्यक्ती.
- राज्यस्तरीय पोलीस कर्मचारी.
- कारागृह कर्मचारी.
- कोविड 19 सेवेत असणारे Revenue officials
- होम गार्ड


लसीकरणाच्या वेळी काय करावं आणि काय करु नये?


- कोविडची ही लस फक्त 18 वर्षांवरील वयोगटात येणाऱ्यांना देण्यात येणार आहे.
- लसींच्या मात्रेमध्ये किमान 14 दिवसांचं अंतर असणं अपेक्षित.
-पहिल्या मात्रेच्या वेळी ज्या लसीचा वापर करण्यात आला आहे, त्याच (कंपनीच्या) लसीचा वापर दुसऱ्या लसीसाठी करावा.
- परस्पर लसींमध्ये बदल करण्यास परवानगी नाही.


कोणी काळजी घ्यावी?


कोणत्याही प्रकारची अॅलर्जी असणाऱ्यांनी, वैद्यकिय किंवा खाद्यपदार्थांची अॅलर्जी असणाऱ्यांनी आणि कोरोना लसीच्या पहिल्या मात्रेनंतर कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. सध्याच्या घडीला गरोदर आणि स्तनपान महिलांसाठी या लसींची चाचणी घेण्यात आली नसल्यामुळं त्यांना लस न देण्याची सूचना करण्यात आली आहे.