नवी दिल्ली : कोरोनाव्हायरस लस बनविण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठ मागच्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणाऱ्या कोरोना व्हायरस विरोधात लस विकसित करण्याचे काम करत आहे. ऑक्सफर्डने पहिल्या स्टेजमध्ये केलेल्या लसीच्या मानवी परीक्षणाचे निकाल सकारत्मक मिळाले या संदर्भातील अहवाल द लॅन्सेट मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. ही लस कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी मानवी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करते.





अधिकृत AZD1222 या नावाने ओळखली जाणारी हीलस जेनर इन्स्टिट्यूटने बनवली आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, जेनर इन्स्टिट्यूटची ही लस कोरोनाव्हायरस पासून दुहेरी संरक्षण प्रदान करु शकेल, ही लस शरीरात अँटीबॉडीड आणि किलर टी- सेल्स बनवण्यात मदत करु शकते. ज्यामुळे कोरोनाव्हारस विरुद्ध लढण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होईल.


भारताच्या दृष्टीने या लसीचं यशस्वी होणं महत्त्वाचं


भारताच्या दृष्टीने या लसीचं यशस्वी होणं फार महत्त्वाचं आहे. कारण या लसीसाठी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटने कोट्यवधींची गुंतवणूक केलीय. सिरमचे प्रमुख अदर पुनावाला यांच्या माहितीनुसार त्यांच्याकडे या लसीचे कोट्यवधी डोस तयार आहेत. त्यांनीही या लसीच्या मानवी चाचणीची परवानगी घेतलीय. ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्याचं यश आता फार महत्त्वाचं ठरणार आहे. ते यशस्वी झाल्यास कोरोनावर खऱ्या अर्थाने उत्तर सापडलेलं असेल.


भारतातही लवकरचं लस उपलब्ध येण्याची शक्यता


हैदराबादच्या भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड Bharat Biotech International Limited या औषध कंपनीने आयसीएमआर म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ही वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च संस्था तसंच पुण्यातील एनआयव्ही म्हणजे राष्ट्रीय विषाणु विज्ञान संशोधन केंद्र यांच्या सहकार्याने कोरोनाला प्रतिबंध करणारी लस बनवली आहे. या लसीच्या मानवी चाचण्यांना परवानगी मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वीच या लसीच्या परवानगी देताना आयसीएमआरने 15 ऑगस्टपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करुन देण्याचं आवाहन भारत बायोटेक कंपनीला केलं आहे. हे पत्र सोशल मीडियात खूप व्हायरल झालं होतं. जेमतेम दीड महिन्यात लस बनवणं शक्य आहे का? मानवी चाचण्यांच्या सर्व टप्प्यांच्या संशोधनासाठी हा कालावधी अपूर्ण आहे, अशा चर्चाही मोठ्या प्रमाणात झाल्या.