नवी दिल्ली : यूआयडीएआयने आधारशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आता ट्विटर सर्व्हिस सुरु केला आहे. यासंबंधातील कोणतीही माहिती आता ट्विटर सर्व्हिसद्वारे मिळू शकते. यूआयडीएआयच्या ट्विटर अकाऊंट @UIDAI आणि @Aadhaar_Care वर ट्वीट करुन तुम्ही आधारशी संबंधित कोणतीही माहिती मिळवू शकता. याशिवाय आधार केंद्रांच्या प्रादेशिक कार्यालयाचं अधिकृत ट्विटर हॅण्डलही देण्यात आलं आहे. इथे देखील तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता किंवा प्रश्न विचारु शकता.


यूआयडीएआयच्या सर्व सुविधा आता ऑनलाईन
यूआयडीएआयने आता आपल्या सर्व सुविधा ऑनलाईन केल्या आहे. आधार कार्डावरील नाव बदलणं असो किंवा फोन क्रमांक, किंवा इतर कोणतीही माहिती आता ऑनलाईन मिळवता येऊ शकतात. 1947 या कस्टमर केअर नंबरवरही फोन करुन मदत घेता येईल. याशिवाय help@uidai.gov.in वर ई-मेल पाठवून माहिती मिळवता येईल.


यूआयडीएआय 1 जूनपासून देशभरात आधार अपडेशनचं काम करत आहे. याअंतर्गत लोकेशन आणि बायोमेट्रिक अपडेट केले जात आहेत. आधारच्या निर्देशांनुसार, कोणत्याही अपडेशनमध्ये जर फ्रॅन्चायजी चुकीच्या पद्धतीने किंवा जास्त पैसे वसूल करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. देशभरात आधार अपडेशनसाठी 17 हजारांपेक्षा जास्त केंद्र बनवण्यात आले आहेत.


आधार सेवाने ट्वीट करुन सांगितलं की, लवकरच परिस्थितीचं गांभीर्य ओळखून इतर ठिकाणीही आधार केंद्र सुरु केले जातील. कोरोनाव्हायरस आणि लॉकडाऊनमुळे देशभरात आधार कार्ड अपडेशनचं काम बंद करण्यात आलं होतं. याच दरम्यान यूआयडीएआयने आधार फ्रॅन्चायजी देण्यास सुरुवात केली. यासाठी इच्छुक उमेदवारांना केवळ एक परीक्षा देऊन त्यात उत्तीर्ण व्हावं लागेल.


यूआयडीएआयकडून आयोजित एक ऑनलाईन परीक्षा जवळच्या केंद्रात देता येईल. आधार फ्रॅन्चायजी घेण्यासाठी सर्वात आधी नोंदणी करावी लागते. जर तुम्हाला आपल्या फ्रॅन्चायजीचं रुपांतर मान्यताप्राप्त केंद्रात करायचं असेल तर यासाठीही वेगळी नोंदणी करावी लागेल.