Sputnik V : संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकलं आहे. अशातच अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच जगभरात कोरोना लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. भारतातही लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसी सध्या दिल्या जात आहेत. यात आता भारतीय औषध नियामकांकडून रशियाच्या स्पुटनिक V लसीच्या आपत्कालीन वापराला भारतात मंजुरी मिळाली आहे.
औषध निर्मिती क्षेत्रातील कंपनी डॉ. रेड्डीज लेबोरेटरीज या लसीची निर्मिती आणि वितरण करणार आहे. नागरिकांना या लसीचे दोन डोस घ्यावे लागतील. पहिला डोस घेतल्यानंतर 21 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागेल. लस घेतल्यानंतर 28 आणि 42 दिवसांमध्ये शरीरात रोगप्रतिकारक शक्ती विकसित होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे लसीचे दोन डोस घेणं आवश्यक असणार आहे.
डॉ. रेड्डीजने स्पुटनिक V लस भारतामध्ये आणण्यासाठी 'रशिया डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड' यांच्यासोबत करार केला आहे. भारतात सध्या सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सीन लस दिली जात आहे. आता या दोन लसींसोबत आणखी एका लसीला मान्यता मिळाल्यास लसीकरणाच्या मोहीमेला वेग येणार आहे.
Sputnik V लस घेतल्यानंतर दोन महिने दारुचे सेवन नको, रशिया सरकारचा नागरिकांना सल्ला
भारतात सध्या स्थानिक पातळीवर कोविडच्या दोन लस तयार केल्या जातात. यात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सीन या लसींचा समावेश आहे. यानंतर आता स्पुटनिक V (डॉ. रेड्डी यांच्या सहकार्याने) या लसीला आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे. तर जॉनसन आणि जॉनसन सहकार्याने बायोलॉजिकल ई, नोवॅवॅक्स लस (सीरम इन्स्टिट्यूट इंडियाच्या सहकार्याने तसे झाइडस कॅडिलाची लस आणि भारत बायोटेकची इंट्रानेसल या लसींना देखील परवानगी मिळू शकते.
स्पुटनिक V चे लस घेतल्यानंतर 2 महिने दारुचे सेवन न करण्याचा सल्ला
'स्पुटनिक V ' चे लसीकरण सुरु झाल्यानंतर रशिया सरकारने आपल्या नागरिकांना दोन महिने दारुचे सेवन न करण्याचा सल्ला दिलाय. लसीकरणाच्या बाबतीत रशियाने जगात बाजी मारली आहे. रशियात सध्या आरोग्यकर्मी, सैनिक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना लस देण्यास सुरुवात झालीय. रशियाच्या या सल्ल्याने आता मद्यप्रेमींची चांगलीच गोची झाल्याचं दिसतंय. कोरोनाची लस घेतल्यानंतर दारुचे सेवन न करण्याच्या सल्ल्यामागे लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा उद्देश आहे असं रशियाच्या प्रशासनानं स्पष्ट केलंय.