Covid-19 Review Meeting: कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (22 मार्च) सायंकाळी आढावा बैठक घेतली. यावेळी कोरोना आणि एचएन 2 इन्फ्लूएंझा व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी सावध आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, आरोग्य सचिव राजेश भूषण, आयसीएमआरचे राजीव बहल, नीती आयोगाचे व्ही के पॉल आणि इतर उपस्थित होते.
या बैठकीत जगभरातील कोविड-19 ची परिस्थिती आणि भारतातील वाढती प्रकरणे समाविष्ट करून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य सचिवांनी एक व्यापक सादरीकरण केलं. या सादरीकरणात पंतप्रधानांना माहिती देण्यात आली की, 22 मार्च 2023 रोजीपर्यंत भारतात नवीन प्रकरणांमध्ये किरकोळ वाढ झाली आहे. दररोज सरासरी 888 प्रकरणे आणि साप्ताहिक संसर्ग दर 0.98 टक्के नोंदवला गेला आहे. या आठवड्यात जागतिक स्तरावर दररोज सरासरी 1.08 लाख कोरोनाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
कोविड-19 चा आढावा घेण्यासाठी 22 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या या आधीच्या शेवटच्या बैठकीत पंतप्रधानांनी दिलेल्या निर्देशांनुसार, पुढे काय कारवाई करण्यात आली याची माहितीही या बैठकीत देण्यात आली. 20 मुख्य कोविड औषधं, 12 इतर औषधं, 8 बफर औषधं आणि 1 इन्फ्लूएंझा औषधांची उपलब्धता आणि किंमतींवर लक्ष ठेवले जात आहे, अशी माहितीही त्यांना देण्यात आली. 27 डिसेंबर 2022 रोजी 22 हजार रुग्णालयांमध्ये एक मॉक ड्रिल अर्थात रंगीत तालीम सुद्धा देखील घेण्यात आली आणि त्यानंतर त्यानुसार रुग्णालयांनी अनेक उपाययोजना केल्या, हे सुद्धा पंतप्रधानांना सांगण्यात आलं. विशेषत: गेल्या काही महिन्यांत H1N1 आणि H3N2 च्या मोठ्या संख्येनं आढळलेल्या रुग्णांच्या अनुषंगानं, देशातील एन्फ्लूएंझा रुग्ण परिस्थितीबद्दल पंतप्रधानांना माहिती देण्यात आली.
जिनोम सिक्वेंसिंग साठी नियुक्त केलेल्या INSACOG प्रयोगशाळांमध्ये, लागण झालेल्या नमुन्यांचं संपूर्ण जिनोम सिक्वेंसिंग वाढवण्याचे निर्देश पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिले. यामुळे विषाणूचे नवीन प्रकार उद्भवले असल्यास त्यांचा मागोवा घेण्यास आणि वेळेवर उपाय तसेच उपचार करण्यास मदत मिळू शकेल.
रूग्ण, आरोग्य व्यावसायिक आणि आरोग्य कर्मचारी या सर्वांनी, रुग्णालयाच्या आवारात मास्क घालण्यासह कोविड योग्य वर्तनाचं पालन करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेले रुग्ण गर्दीच्या ठिकाणी वावरत असताना, त्यांनी आणि सर्वांनी मास्क घालणं उपयुक्त आहे असही पंतप्रधानांनी यावेळी ठामपणे सांगितलं.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना विषाणूची 1134 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या (उपचार सुरू असलेले रुग्ण) 7026 वर पोहोचली आहे. सकाळी आठ वाजता जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, संसर्गामुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 5,30,813 झाली आहे. मंगळवारी कोरोना विषाणू संसर्गाची 699 नवीन प्रकरणे समोर आली होती.