नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. चीनमधून उद्भवलेल्या या धोकादायक विषाणूमुळे जगभरातील 29,723,628 लोकांना संसर्ग झाला आहे तर 939,137 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोविड -19 वर अद्याप तरी कुठलंही औषध किंवा लस आलेली नाही. मात्र जगभरात अनेक शास्त्रज्ञ ही लस शोधण्यासाठी दिवसरात्र एक करत आहेत. अशात एक दिलासादायक संशोधन समोर आले आहे.
कॉम्यूटरद्वारे डिझाईन केलेलं सिंथेटिक व्हायरल अँटी-प्रोटीन हे एसएआरएस-सीओव्ही -2 पासून मानवी पेशींचं संरक्षण करण्यास सक्षम असल्याचं या संशोधनात म्हटलं आहे. कोरोना विषाणूचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत असताना हा शोध काहीसा दिलासा देणारा आहे. शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, प्रयोगशाळेत संगणकाद्वारे डिझाईन केलेले सिंथेटिक व्हायरल अँटी-प्रोटीन हे मानवी पेशींना सार्स-सीओव्हीच्या- 2 म्हणजे कोरोनाच्या विषाणूपासून वाचवू शकतो. कोरोना सार्स-सीओव्ही -2 संसर्गामुळेच होतो. ‘सायन्स’ या जर्नलमध्ये याबाबत एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. यानुसार सर्वात मजबूत अँटी-व्हायरस एनसीबी 1 ने या प्रयोगादरम्यान एसएआरएस-सीओव्ही -2 चा प्रतिकार केला तसंच कोरोनाच्या अँटीबॉडीला निष्क्रिय केलं.
'हॅप्पी हायपॉक्सीया' मुळे कोरोनाबाधितांचे सर्वाधिक मृत्यू
अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधकांचे म्हणणे आहे की एनसीबी 1 ची सध्या उंदीरांवर चाचणी घेण्यात येत आहे. त्यांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार सर्व कोरोना विषाणूंमध्ये एक स्पाइक प्रोटीन असते जो मानवी पेशीशी चिकटून राहतो आणि विषाणूला पेशीच्या पडदा तोडण्यास आणि संक्रमित करण्यास मदत करतो. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जर व्हायरसला पेशीमध्ये प्रवेश करण्याची ही यंत्रणा रोखण्यासाठी एखादी पद्धत विकसित केली गेली तर कोविड -19 उपचार करणे शक्य आहे.
शास्त्रज्ञांनी संगणकांचा वापर करून नवीन प्रथिने तयार केली आहेत. जी सार्स-सीओव्ही -2 स्पाइक प्रोटीनचा प्रतिकार करतात. 2 दशलक्षांपेक्षा जास्त स्पाइक-बाइंडिंग प्रथिने विकसित केली गेली. त्यापैकी 118,000 हून अधिक प्रयोगशाळेत बनवून त्यांची चाचणी घेण्यात आली. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे लाँगशिंग काओ यांनी सांगितलं की, यासाठी मोठ्या प्रमाणात क्लिनिकल स्क्रीनिंग / चाचणी आवश्यक असली तरी आम्हाला असे वाटते की संगणकाद्वारे विकसित अँटी-व्हायरस प्रोटीनचे चांगले परिणाम होतील, असं काओ यांनी सांगितलं.