बीड : मला काहीच लक्षणं नाहीत..मला कोरोना नाही.. असे समजणार्‍यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कोरोना झालेल्या व्यक्तीला त्याची ऑक्सिजन पातळी कमी झाल्याचे कळत नाही आणि ज्यावेळी कळते त्यावेळेस फार उशीर झालेला असतो. बीड जिल्ह्यात अशाच रुग्णांचा मृत्यू आता वाढताना पाहायला मिळतो आहे, त्याचं कारण आहे हॅपी हायपॉक्सीया.


कोणाला सर्दी झाली अथवा ताप आला की लगेच कोरोना झाला असे होत नाही.. पण ज्यांना कोणतेच लक्षण नाहीत अशांना काहीच होत नाही असे ही नाही. बीड जिल्ह्यात तर शरीरातील ऑक्सिजन कमी झाला आणि ते न कळल्यामुळे उपचार वेळेवर मिळाला नाही म्हणून सर्वाधिक मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे अशा रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजन कमी झाल्यास रुग्णाला कळत नाही आणि ज्या वेळेस कळते त्यावेळेस त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन एकदम कमी झालेला असतो. असे रुग्ण उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचतात तेव्हा त्या रुग्णांचा 24 ते 72 तासात मृत्यू होत असल्याचे पुढे आले आहे.


हॅपी हायपॉक्सीया म्हणजे काय ?




  • ज्या व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली आहे. त्या व्यक्तीच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होत असताना ती जाणवत नाही.

  • या रुग्णांना धाप लागणे अथवा श्वास घ्यायला त्रास होत नाही.

  • मात्र प्रत्यक्षात या रुग्णाची ऑक्सिजन पातळी इतकी कमी असते की उपचार करणे ही अवघड असते.


या स्थितीला हॅपी हायपॉक्सीया असे म्हणतात.


बीडमध्ये मागच्या काही दिवसात मृत्यू पावलेल्या कोरोनाच्या रुग्णामध्ये या बहुतेक मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या बाबतीत अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ.सिद्धेश्वर बिराजदार म्हणाले, हॅप्पी हायपोक्सीया ओळखणे सोपे आहे. त्यासाठी पल्स ऑक्सिमीटरने शरीरातील ऑक्सिजनची पातळी..हृदयाचे ढोके.. यांची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे. निरोगी माणसाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ही 95 ते 99 इतकी असते. या पेक्षा कमी असेल तर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने ऑक्सिमीटरचा वापर करावा.


लॉकडाऊनच्या चार महिन्यात कुपोषित बालकांमध्ये वाढ, पोषण आहार 2-3 महिने उशिराने पोहोचल्याने परिणाम