नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अनेक बालकांच्या आयुष्यातून आनंद जणू हिरावूनच घेतला आहे. राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगानं जारी केलेल्या रिपोर्टमधील आकडेवारीनुसार, जवळपास 3621 बालकं अनाथ झाली आहेत. तर 26,176 मुलांच्या डोक्यावरुन आई-वडिलांचं छत्र हरपलं आहे. गेल्या वर्षीच्या 1 एप्रिल ते या वर्षीच्या मे महिन्यापर्यंतची ही आकडेवारी आहे. 


राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने एका प्रतिज्ञापत्रकाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाला वरील माहिती दिली आहे. आयोगानं आपल्या अहवालात सांगितलं आहे की, अनाथ झालेल्या मुलांमध्ये सर्वच मुलांचे आई-वडिलांचे निधन हे कोरोनामुळे झालं आहे असं नाही, त्यामागे अन्यही काही कारणे असू शकतात. 


30 हजार मुलांच्या देखभालीची गरज
राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगानं सांगितलं आहे की, एकूण 30,071 बालकांच्या देखभाल आणि सुरक्षेच्या उपाय योजनेची आवश्यकता आहे. त्यामध्ये 15,620 मुलं आहेत तर 14,447 या मुली आहेत. आयोगाने असंही सांगितलं आहे की, 11,815 बालकं ही 8 ते 13 या वयोगटातील आहेत तर 4 ते 7 या वयोगटातील बालकांची संख्या ही 5,107 इतकी आहे. 


राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 7,084 बालकं, उत्तर प्रदेशमध्ये 3172, राजस्थानमध्ये 2482 बालकांना सुरक्षेची गरज आहे. त्यानंतर हरयाणामध्ये 2438, मध्य प्रदेशमध्ये 2243 आणि केरळमधील 2002 बालकांचा समावेश आहे.


केंद्र सरकारची  पीएम चाईल्ड केअर योजना
कोरोना महामारीमुळे अनाथ झालेल्या बालकांना आधार देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेत पीएम चाईल्ड केअर योजना जाहीर केली आहे. या योजने अंतर्गत अनाथ मुलांना 18 वर्षांच्या वयानंतर मासिक भत्ता मिळेल. तर वयाच्या 23 व्या वर्षी पीएम केअर फंडकडून 10 लाख रुपयांचा निधी दिला जाणार असून या मुलांना मोफत शिक्षण दिले जाणार आहे. उच्च शिक्षणासाठी कर्ज दिले जाईल आणि त्याचे व्याजही पीएम केअर फंडकडून दिले जाणार असल्याची घोषणा करण्यात आलीय. आयुष्मान भारत योजने अंतर्गत 18 वर्षांसाठी 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा देण्यात येईल. दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना नजीकच्या केंद्रीय विद्यालय किंवा खाजगी शाळेत दाखल केले जाईल. 11 ते 18 वर्षे वयोगटातील मुले सैनिक शाळा आणि नवोदय विद्यालय सारख्या निवासी शाळेत दाखल होतील. 


पीएम चाईल्ड केअर योजनेचा फक्त दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अनाथ म्हणून समावेश करण्यात आला आहे. प्रत्यक्ष आई किंवा वडिलांचे कोरोनामुळे छत्र गमावलेल्या आणि अनाथ झालेल्या बालकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांचं वाली कोण हा प्रश्न देखील उपस्थित होतो आहे.


महत्वाच्या बातम्या :