मुंबई : पहाटेच्या शपथविधीवरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळतंय. अशातच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून आज चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. भाजप नेते अजूनही दीड ते दोन वर्षांपूर्वीच्या पहाट सोहळ्यांमध्येच गुंतून पडलेत, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. दरम्यान, अजित पवारांनी 54 आमदारांच्या सह्यांचं पत्र चोरणं, नैतिक की, अनैतिक असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला होता. यावरुन त्यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आलं.
सामनातून म्हटलं आहे की, "अजित पवारांनी 54 आमदारांच्या सहीचे पत्र चोरणे हे नैतिक की अनैतिक असा सवाल चंद्रकांत पाटलांनी करणे हे त्यांच्या मनातील अस्वस्थतेचे लक्षण आहे . चंद्रकांत पाटलांनी याप्रकरणी 'आ बैल मुझे मार' असेच केले आहे." तसेच मोठ्या पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरत असताना, अजित पवारांसोबत भाजपचे कोण कोण लोक होते असा सवालही सामनातून विचारला आहे. "एक संशयास्पद गोपनिय विषय बंद पेटीत पडला होता, त्याचे टाळे चंद्रकांत पाटलांनी उघडलं. भाजपच्या दादांनी राष्ट्रवादीच्या दादांवर ' लेटर बॉम्ब ' टाकला खरा, पण तो चंद्रकांतदादांच्या हातातच फुटला.", असंही सामनातून म्हटलं आहे.
वाचा सामनाचा संपूर्ण अग्रलेख : पत्र चोरण्यास कारण की...
अजित पवारांनी 54 आमदारांच्या सहीचे पत्र चोरणे हे नैतिक की अनैतिक असा सवाल चंद्रकांत पाटलांनी करणे हे त्यांच्या मनातील अस्वस्थतेचे लक्षण आहे . चंद्रकांत पाटलांनी याप्रकरणी ' आ बैल मुझे मार ' असेच केले आहे . अजित दादा मोठय़ा पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरीत असताना त्या काळोख्या खोलीत ' टॉर्च ' चा प्रकाश मारण्यासाठी व पत्र हाती येताच खिडकीतून पोबारा करण्यासाठी अजित पवारांबरोबर भाजपचे कोण कोण लोक होते ? याचाही खुलासा आता व्हायला हवा . एक संशयास्पद , गोपनीय विषय बंद पेटीत पडला होता . त्याचे टाळे चंद्रकांतदादांनी उघडले . भाजपच्या दादांनी राष्ट्रवादीच्या दादांवर ' लेटर बॉम्ब ' टाकला खरा , पण तो चंद्रकांतदादांच्या हातातच फुटला .
गांभीर्य आणि संयम हे महाराष्ट्रातील राजकारणाचे वैशिष्टय़ आहे. खासकरून राज्यात कोरोना महामारीसारखे भयंकर संकट धुमाकूळ घालत असताना राज्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी संयम राखणे गरजेचे आहे. नाहीतर जनता त्यांना गांभीर्याने घेण्याचे बंद करेल. उचलली जीभ लावली टाळय़ाला असला प्रकार सध्या विरोधी पक्षाने सुरू केला आहे. भाजपचे नेते आजही दीड-दोन वर्षांपूर्वीच्या 'अजित-देवेंद्र' यांच्या शपथविधीच्या पहाट सोहोळय़ातच गुंतून पडले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी एक चांगले केले. त्यांनी आता सांगून टाकले, अजित पवारांबरोबर घाईघाईत सरकार बनवले ही आपली चूकच झाली. असे केल्याने आपल्या प्रतिमेस तडा गेल्याचेही त्यांनी मान्य केल्याने त्यांच्यापुरता या प्रकरणावर पडदा पडला, पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना मात्र त्यांचे मन त्या पहाटेच्या गुंत्यातून बाहेर पडू देत नाही. राजकारणातील गुंत्यात इतके अडकून पडणे बरे नसते, पण पाटलांना हे सांगायचे कोणी! श्री. पाटील यांनी आता असा स्फोट केला आहे की, पहाटेच्या शपथविधीसाठी अजित पवार यांनी जे 54 आमदारांच्या सहीचे पत्र भाजप नेत्यांच्या माध्यमातून राज्यपालांना सादर केले तो एक मोठा घोटाळा आहे. हे पत्र अजित पवारांनी शरद पवारांच्या ड्रॉवरमधून चोरले. हे असे पत्र चोरणे नैतिक की अनैतिक, असा प्रश्न पाटलांनी विचारला आहे. पाटलांचा पत्रचोरीचा स्फोट म्हणजे पोरखेळ आहे. राजकारणात व युद्धात सर्व माफ असते. चढाई करून विजय मिळवायचा असतो. त्यासाठी अनेकदा नैतिक-अनैतिकेच्या पलीकडे जाऊन कार्य सिद्धीस न्यायचे असते. अजित पवारांचे ते पत्र हा भाजप व अजित पवारांतील
गुप्त करार
असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत गुप्तच राहायला हवा होता. पण पाटलांनी अकारण भांडाफोड करून आपण भविष्यात मोठे राजकारण करण्यास सक्षम नसल्याचे दाखवून दिले. गोपनीय गोष्ट घडली व त्यातून यश प्राप्त झाले नाही तरी त्या गोपनीयतेचा हा असा बोभाटा होणे योग्य नाही. पण भडकलेल्या चंद्रकांत पाटलांनी एका तिरमिरीत पहाटेच्या शपथविधीचे सर्व गुप्त कट लोकांसमोर आणले आहेत. पण त्यांच्या भांडाफोडीत इतरही अनेक कंगोरे आहेत. अजित पवार यांनी पवारांच्या डॉवरमधून पत्र चोरले हा आरोप निव्वळ भंपक आहे. 54 आमदारांच्या सहीचे पत्र अजित पवारांना चोरण्याची आवश्यकता नाही. जेव्हा पहाटेचे हे उद्योग सुरू होते तेव्हा अजित पवार हे राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवडले गेलेच होते व आमदारांच्या सहीचे पत्र त्यांच्याकडे असणारच. ते चोरले किंवा बनावट पद्धतीने मिळवले असे सांगणे हा राजकीय बालिशपणा आहे. किरकोळ चोऱयामाऱया करून राजकीय गुजराण करणाऱयातले अजित पवार नाहीत. पहाटे त्यांनी एक प्रयोग केला तो फसला. असे प्रयोग देशाच्या राजकारणात अधूनमधून होतच असतात. दुसरे असे की, अजित पवारांनी 54 आमदारांच्या सहीचे पत्र चोरणे हे नैतिक की अनैतिक असा सवाल चंद्रकांत पाटलांनी करणे हे त्यांच्या मनातील अस्वस्थतेचे लक्षण आहे. अजित पवारांनी पत्र चोरले हे अनैतिक असल्याचा पाटलांचा दावा मान्य केला तरी ते चोरलेले पत्र भाजप नेत्यांनी स्वीकारणे, त्यावर विश्वास ठेवून ते राज्यपालांकडे सुपूर्द करणे, त्या चोरलेल्या पत्राच्या आधारे राजभवनात सरकार स्थापन करून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणे हे फक्त अनैतिकच नाही, तर बेकायदेशीरदेखील ठरते. शिवाय हा मोठा
अपराधदेखील
आहे! चोरी हा गुन्हा आहेच, पण चोरीचा माल विकत घेणे हा त्यापेक्षा मोठा गुन्हा आहे. त्यामुळे चोरलेल्या पत्राचा राजकीय व्यापार करणाऱया भाजप व त्यांच्या पुढाऱयांवर निवडणूक आयोगाने व पोलिसांनी फौजदारी गुन्हेच दाखल केले पाहिजेत. चंद्रकांत पाटलांनी याप्रकरणी 'आ बैल मुझे मार' असेच केले आहे. अजित दादा मोठय़ा पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरीत असताना त्या काळोख्या खोलीत 'टॉर्च'चा प्रकाश मारण्यासाठी व पत्र हाती येताच खिडकीतून पोबारा करण्यासाठी अजित पवारांबरोबर भाजपचे कोण कोण लोक होते? याचाही खुलासा आता व्हायला हवा. एक संशयास्पद, गोपनीय विषय बंद पेटीत पडला होता. त्याचे टाळे चंद्रकांतदादांनी उघडले. भाजपच्या दादांनी राष्ट्रवादीच्या दादांवर 'लेटर बॉम्ब' टाकला खरा, पण तो चंद्रकांतदादांच्या हातातच फुटला. पुन्हा दादा एकीकडे अजित पवारांवर पत्र चोरीचा आरोप करतात, तर दुसरीकडे शिवसेनेने 'दगा' दिला म्हणून शिवसेनेला धडा वगैरे शिकविण्याचा प्रयत्न भाजपने केला, असेही सांगतात. बरं, हा प्रयत्न फसला असेही मान्य करतात. मुळात राजकारणात अशा असलेल्या-नसलेल्या गोष्टी कितीही उगाळल्या तरी त्यातून मनस्तापाशिवाय हाती काहीच लागत नाही. चंद्रकांतदादांसारख्या ज्येष्ठ नेत्याला हे सांगण्याची तशी गरज नाही. सत्ता गेल्याचे शल्य ठीक आहे, पण दादा अशी किती तगमग करून घेणार आहात? खरे म्हणजे राजकारणात सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षालाही एक महत्त्व, स्थान असते. मात्र विरोधी पक्षच गांभीर्याने न वागता उथळपणे वागू लागला तर त्यांचे महत्त्व, लोकांचा त्यांच्यावरील विश्वास आपोआपच कमी होतो. भाजपने विश्वास गमावला याचे मूळ त्यांच्या या स्वभावात आहे. दिलेले शब्द पाळायचे नाहीत हे तर आहेच, पण जे घडलेच नाही तेच सत्य असल्याचे ओरडत राहायचे हे त्यांचे धोरण आहे. महाराष्ट्राचे राजकारण त्यामुळेच बदलले, हे मात्र नक्की!