मुंबई : आज सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश करत आहे, म्हणजेच लोकपरंपरेनुसार पावसाळ्याला सुरुवात होत आहे. मंगळवारच्या पहाटेपासूनच हे चित्र पाहायला मिळत आहे. मंगळवार, म्हणजेच 8 जून 2021 ला सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करत आहे. दिनदर्शिकांमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार यावेळी त्याचं वाहन गाढव आहे. या नक्षत्राच्या परिणामार्थ अल्प प्रमाणात पर्जन्यमानाचा अंदाज पंचांगातूनही सांगण्यात आला आहे. 


कोकण, मध्य महाराष्ट्र या भागात नक्षत्राचे परिणाम दिसून येणार आहेत. नक्षत्राच्या अखेरीस मात्र वादळी पावसाचा योग असल्याची माहिती महालक्ष्मी दिनदर्शिकेतून देण्यात आली आहे. वादळी पावसाचे परिणाम 13, 14, 15 आणि 19 जून या दिवशी दिसणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 


दरम्यान, मुंबईसह उपनगरांमध्येही सोमवारपासूनच पावसाळी वातावरणाचं चित्र पाहायला मिळालं होतं. सोमवारी मान्सूनपूर्व सरी बरसल्यानंतर दिवसभर पावसानं विश्रांती घेतली होती. ज्यानंतर मध्यरात्र उलटून गेल्यानंतर आणि मंगळवारच्या पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा मुंबईसह पश्चिम उपनगर आणि नवी मुंबई भागात भावसाला सुरुवात झाली. मुसळधार आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली असून, या निमित्तानं वरुणराजाचं आगमन झाल्याची ग्वाहीसुद्धा सर्वांनाच मिळाली. 


तळकोकणात 10 ते 15 जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा, या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, उपजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


फक्त मुंबई आणि नजीकचा परिसरच नव्हे, तर मागील काही दिवसांपासून कोकण आणि राज्याच्या इतर भागातही पावसासाठीचं पूरक वातावरण पाहायला मिळत होतं. याच धर्तीवर बळीराजानं शेतीच्या कामांनाही सुरुवात केली होती. ग्रामीण भागापासून ते अगदी शहरात चाळी आहेत तिथं उन्हाळा संपल्यानंतर आणि पावसाची सुरुवात होण्याच्या पार्श्वभूमीवर घराची कौलं स्वच्छ करत त्यांची योग्य पद्धतीनं रचना करण्याची घाई दिसली, तर कुठे यंदाच्या हंगामासाठी बळीराजानं शेताची वाट धरल्याचं दिसून आलं. आव्हानाच्या या दिवसांमध्ये आलेला हा पाऊस जणू नव्या आशेचीच बरसात करत सर्वांच्या जीवनावर शिडकावा करणार असल्याचीच अनुभूती यातून होत आहे.