COVID 19 Update : भारतात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये अनेक विषयांबाबत माहिती देण्यात आली.  आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, भारतासह जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. जगभरात मागील आठवडाभरात सरासरी 25 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. जगभरातील अॅक्टिव रुग्णाची संख्या वाढून 4 कोटी 49 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की,  ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे जगभरात आतापर्यंत 115 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. भारतातही ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार ओमायक्रॉनचा संसर्ग डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक वेगाने होत आहे. आकडेवारीनुसार, दक्षिण आफ्रिका, युके, कॅनडा, डेन्मार्क येथे डेल्टाच्या तुलनेत ओमायक्ऱनचे रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण घटले आहे.  


आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, जगभरात कोरोना रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. 10 जानेवारीपासून जगभरात कोरोना रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 10 जानेवारी रोजी जगभरात 31.59 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली, आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे. तब्बल 159 देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. युरोपमधील चार खंड, युके, फ्रान्स आणि अमेरिकामध्ये वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अमेरिकामध्ये 11 जानेवारी रोजी एका दिवसात 11 लाखांपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णाची नोंद झाली. 


आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशातील अॅक्टिव रुग्णांची संख्या 9,55,319 इतकी झाली आहे. देशातील दैनंदिन सरासरी रुग्णसंख्या  1,50,307 इतकी झाली आहे. देशाचा पॉझिटिव्हिटी रेट 9.82 टक्क्यांवर पोहचला आहे. 30 डिसेंबर रोजी देशात 13 हजार रुग्णांची नोंद झाली होती. आत 12 डिसेंबर रोजी ही संख्या वाढून एक लाख 94 हजार इतकी झाली आहे. सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट असणाऱ्या राज्यात पश्चिम बंगाल पहिल्या स्थानावर आहे. पश्चिम बंगालमध्ये 32.18% इतका पॉझिटिव्हिटी रेट आहे. त्यानंतर दिल्लीमध्ये 23.1% इतका पॉझिटिव्हिटी रेट आहे. तर महाराष्ट्रात  22.39% इतका पॉझिटिव्हिटी रेट आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये 4.47% इतका पॉझिटिव्हिटी रेट आहे, असे लव अग्रवाल यांनी सांगितले.


19 राज्यांत 10 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव रुग्ण -  
देशातील काही राज्यातील रुग्णसंख्यामध्ये मोठी वाढ होत आहे. त्यांचा पॉझिटिव्हिटी रेटही दिवसागणिक वाढत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.  येथील पॉझिटिव्हिटी रेटही दिवसागणिक वाढतच आहे. देशातील 19 राज्यातील अॅक्टिव रुग्णसंख्या दहा हजारांपेक्षा जास्त झाली आहे. तर चार राज्यातील अॅक्टिव रुग्णसंख्या पाच हजार इतकी झाली आहे. पाच हजारांपेक्षा कमी अॅक्टिव रुग्ण असलेल्या राज्यांची संख्या 13 इतकी आहे.  देशातील 300 जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्केंपेक्षा जास्त आहे. चार जानेवारी रोजी ही संख्या फक्त 78 इतकी होती. यावरुनच कोरोना विषाणूचा वेग समजू शकता.