COVAXIN( BBV152) booster dose : डेल्टा व्हेरियंटने गेल्यावर्षी धुमाकूळ घातला होता. आता ओमायक्रॉन (B.1.529)  व्हेरियंटने हाहाकार माजवला आहे. डेल्टा (B.1.617.2) आणि ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग दर जास्त आहे, तर डेल्टा व्हेरियंटचा मृत्यूदर अधिक आहे. या कोरोना संकटामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणालाही वेग आला आहे. कोरोनाशी जगभरात लढा दिला जात असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोव्हॅक्सिन (BBV152)  लसीचा बूस्टर डोस (Booster Dose) ओमिक्रॉन आणि डेल्टा या दोन्ही व्हेरियंटला निष्क्रीय करु शकतो, असे चाचण्यांमधून दिसून आल्याचा दावा भारत बायोटेक या कंपनीने केला आहे. 


एका लाइव्ह वायरस न्यूट्रलायजेशनद्वारे कोव्हॅक्सिन लसीच्या बोस्टर डोसवर अभ्यास करण्यात आला. यामध्ये ही लस डेल्टा आणि ओमायक्रॉनविरोधात न्यूट्रलायजिंग अँटिबॉडी तयार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोव्हॅक्सिन लसीचा बूस्टर डोस डेल्टा विरोधात 100 टक्के तर ओमायक्रॉनविरोधात 90 टक्के प्रभावी असल्याचे सीरम चाचणीत स्पष्ट झाले आहे. एमोरी यूनिवर्सिटीमध्ये याबाबतचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार, कोव्हॅक्सिन लसीच्या दोन डोस घेतलेल्यांना सहा महिन्यानंतर बूस्टर डोस दिला. बूस्टर डोस घेतल्यानंतर ओमायक्रॉन आणि डेल्टा लसीला न्यूट्रलाइज करण्यात आल्याचं समोर आलं आहे. 






भारत बायोटेक कंपनीने या अभ्यासानुसार, कोव्हॅक्सीन लसीचा बूस्टर डोस ओमायक्रॉन आणि डेल्टा व्हेरियंटविरोधात प्रभावी असल्याचा दावा केला आहे. रोग प्रतिकारक शक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचेही कंपनीने म्हटलेय. 


 Covaxin लस घेतल्यानंतर पॅरासिटामोल, पेन किलर घेऊ नका; भारत बायोटेकचा सल्ला
कोवॅक्सिन लस घेतल्यानंतर किशोरवयीन मुलांनी पॅरासिटामॉल (Paracetamol) किंवा पेनकिलर घेणं टाळावं, असं या पत्रकातून सांगण्यात आलं आहे. भारत बायोटेकनं म्हटलं आहे की, आम्हाला अभिप्राय मिळाला आहे की, काही लसीकरण केंद्रं मुलांसाठी कोवॅक्सिनसह 3 पॅरासिटामॉल 500 मिलिग्राम गोळ्यांची शिफारस करत आहेत. परंतु,  लसीकरणानंतर कोणतीही पॅरासिटामॉल किंवा पेन किलर घेण्याची शिफारस केली जात नाही.  फर्मने 30,000 व्यक्तींवर क्लिनिकल चाचण्यांचा हवाला देत सांगितले की, सुमारे 10-20 टक्के व्यक्तींनी साइड इफेक्ट्स जाणवल्याचं सांगितलं आहे. यापैकी अनेकांना सौम्य साइड इफेक्ट्स जाणवतात, जे साधारणतः 1-2 दिवसांत नाहिसे होतात आणि त्यांना औषधांची आवश्यकता नसते. कोणत्याही प्रकारची पेन किलर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच घ्यावी, असं कंपनीनेही म्हटलं आहे.