Omicron Variant Globally Death : दक्षिण आफ्रिका येथे उदयास आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने जगभरात हाहा:कार माजवला आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे चिंतेत वातावरण आहे. यामध्ये जगभरात मृताची संख्या कमी असली तरी संसर्ग दर अधिक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की,  ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे जगभरात आतापर्यंत 115 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. भारतातही ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार ओमायक्रॉनचा संसर्ग डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक वेगाने होत आहे. आकडेवारीनुसार, दक्षिण आफ्रिका, युके, कॅनडा, डेन्मार्क येथे डेल्टाच्या तुलनेत ओमायक्ऱनचे रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण घटले आहे.  



गेल्या काही दिवसांत देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. १२ जानेवारी रोजी देशातील अॅक्टिव रुग्णांची संख्या  9,55,319  इतकी झाली आहे. याच कालावधीत जगभरातील 159 देशात कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ पाहायला मिळाली.  युरोपमधील आठ देशात सर्वात मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन आठड्यातील ही सर्वात मोठी वाढ मानली जात आहे, असे लव अग्रवाल म्हणाले.  


सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट असणाऱ्या राज्यात पश्चिम बंगाल पहिल्या स्थानावर आहे. पश्चिम बंगालमध्ये 32.18% इतका पॉझिटिव्हिटी रेट आहे. त्यानंतर दिल्लीमध्ये 23.1% इतका पॉझिटिव्हिटी रेट आहे. तर महाराष्ट्रात  22.39% इतका पॉझिटिव्हिटी रेट आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये 4.47% इतका पॉझिटिव्हिटी रेट आहे, असे लव अग्रवाल यांनी सांगितले.  महाराष्ट्रस पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू,  कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरात या राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पुढील काही दिवस या राज्यांच्यासाठी महत्वाचे आहेत, असे अग्रवाल यांनी सांगितले.  


कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली असेल, ज्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत, अशा रुग्णांना सात दिवसानंतर रुग्णालयातून सोडण्यात येईल. सात दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर सौम्य लक्षणे असणाऱ्यांना चाचणी करण्याची गरज नाही, असे लव अग्रवाल यांनी सांगितले.  देशातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत. त्यानंतर काही रुग्णालयातून सोडण्याची काही नियमांत बदल केले जाणार आहेत, असेही अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.