COVID-19 Cases in India : देशातच कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्याचं नाव घेत नाही. दिवसागणिक वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळं आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्स यासाठी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना पायपीट करावी लागत आहे. अशातच देशात पुन्हा एकदा विक्रमी रुग्णवाढ झाल्याचं दिसून आलं आहे. देशात दुसऱ्यांदा एका दिवसात चार लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्यमंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 412,262 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 3980 कोरोनाबाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, 3,29,113 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी देशात 30 एप्रिल रोजी 401,993 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. जगभरातील दैनंदिन रुग्णवाढिपैकी जवळपास 40 टक्के रुग्ण केवळ भारतातील आहेत.  


5 मेपर्यंत देशभरात 16 कोटी 25 लाख 13 हजार 339 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल (बुधवारी) 19 लाख 55 हजार 733 लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 29 कोटी 67 लाखांहून अधिक कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. ज्याचा पॉझिटिव्हीटी रेट 21 टक्क्यांहून अधिक आहे. 


देशातील आजची कोरोना स्थिती


एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 10 लाख 77 हजार 410
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 72 लाख 80 हजार 844
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 35 लाख 66 हजार 398
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 30 हजार 168
देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 16 कोटी 25 लाख 13 हजार 339 डोस


देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.09 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 82 टक्क्यांहून अधिक आहे. अॅक्टिव्ह रुग्ण वाढून 17 टक्के झाला आहे. कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण संख्येत जगभरात भारत दुसऱ्या स्थानी आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येमध्येही भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझील, मॅक्सिकोनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत. 


भारतातील कोरोनाची लाट मेअखेरीस ओसरण्याची शक्यता, विषाणूतज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग यांचं मत


देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. ही दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर असून त्यामुळे दरदिवशी देशात चार लाखांच्या जवळपास नव्या रुग्णांची भर पडताना दिसत आहे. पण या लाटेची तीव्रता कदाचित मे महिन्याच्या अखेरपर्यंत ओसरेल असं मत ख्यातनाम विषाणूतज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग यांनी व्यक्त केलं आहे. महिला पत्रकारांशी व्हर्च्युअली संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. 


कोरोनाची दुसरी लाट कदाचित मे महिन्याच्या मध्यापासून ते महिन्याच्या अखेरपर्यंत ओसरण्याची शक्यता आहे असा आमचा अंदाज सांगतोय असं डॉ. गगनदीप कांग यांनी सांगितलं. यासाठी अनेक अभ्यास करण्यात आले असून काही मॉडेलच्या अभ्यासानुसार, जून महिन्याच्या सुरुवातीला ही लाट ओसरेल असंही समोर आलं आहे. या सर्वांचा एकत्रित अभ्यास करता मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनाची दुसरी लाट ओसरेल अशी शक्यता आहे असंही त्या म्हणाल्या. 


राज्यात बुधवारी 57,640 कोरोनाबाधित रुग्णांचे निदान


राज्यात बुधवारी तब्बल 57 हजार  640 कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर 57 हजार 006 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आजपर्यंत एकूण 41,64,098 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचेप्रमाण (Recovery Rate) 85.32% एवढा झाला आहे. दरम्यान काल 920 कोरोना बाधित रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यातील मत्यूदर 1.49% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,83,84,582 प्रयोगशाळा नमुन्याांपैकी 48,80,542 (17.19 टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 38,52,501 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 32,174 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत बुधवारी 3879 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


मुंबईत काल एकूण 3879 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3686 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 98 हजार 545 आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर 90 टक्के आहे. मुंबईत सध्या एकूण सक्रिय रुग्ण 51 हजार 472 आहे. कोरोना दुप्पटीचा दर आता 123 दिवसांवर गेला आहे. तर कोरोना वाढीचा दर (28 एप्रिल-3 मे) 0.55 टक्क्यांवर गेला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :